ठाणे :भिवंडीतील बेकायदा कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी अमृतलाल निशाद याला अटक केली आहे. तपासात, निशाद याने बेकायदेशीररित्या इमारतीतील रहिवाशांकडून दुरुस्तीसाठी निधी गोळा करून इमारत दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराकडे सोपविल्याची माहिती उघड झाली आहे.

भिवंडी येथील गंगारामवाडी येथील बेकायदा कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीचा ‘बी विंग’ कोसळून १० जणांचा मृत्यू तर तीनजण जखमी झाले होते. या दुर्घटने प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात इमारत मालक बिलाल अहमद अब्दुलकर खान आणि ठेकेदार अशोक यांच्याविरुद्ध भिवंडी महापालिका अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त जितेंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी नुकतीच अमृतलाल निशाद याला अटक केली आहे. निशाद याने रहिवाशांकडून पैसे गोळा करुन इमारतीची दुरुस्ती करण्याचा ठेका अशोक याला दिला होता. बिलाल हा परदेशात असून याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.