LPG gas cylinder shortage in Bhiwandi: इराण–इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका भिवंडीतील स्थलांतरित मजुरांना बसत आहे. वेळेत गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास एप्रिलनंतर गावी परतण्याचा निर्णय अनेकांनी घेतला असून, त्यामुळे स्थानिक उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भिवंडी हे यंत्रमाग उद्योगासाठी ओळखले जाणारे शहर असून येथे मोठ्या प्रमाणात लघुउद्योग, गोदामे, हातमाग आणि यंत्रमाग कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी हजारो स्थलांतरित मजूर परराज्यातून येथे आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरगुती तसेच व्यवसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अपुरा पडत असल्याने मजुरांचे हाल होत आहेत.
गॅस सिलिंडरसाठी एजन्सीबाहेर मध्यरात्रीपासूनच रांगा लागत असून, दररोज मर्यादित सुमारे १०० ते १२० सिलिंडर उपलब्ध होत आहेत. रांगेत ४०० ते ५०० ग्राहक उभे राहत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. ‘जो आधी येईल त्यालाच सिलिंडर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरांना रात्रभर रांगेत थांबावे लागत असून, जागा मिळेल तिथे झोपून रात्र काढण्याची वेळ येत आहे. गॅसअभावी स्वयंपाक करणे कठीण झाले असून हॉटेलमधील जेवण किंवा कोळशाच्या शेगडीचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे मजूर सांगतात. काही मजुरांना तीन ते चार दिवस प्रयत्न करूनही सिलिंडर मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत.
ग्राहकांकडून आधारकार्ड व मोबाइल क्रमांक घेऊनच सिलिंडर वितरण केले जात असून गॅस केवळ घरगुती वापरासाठी दिला जात आहे, असे सिद्धिविनायक गॅस एजन्सीचे चालक सागर कामुर्ती यांनी सांगितले. तर, एजन्सीकडे १२० सिलिंडर उपलब्ध असताना रांगेत ४०० ते ५०० ग्राहक होते. मजुरांना दोनवेळचे जेवण मिळत नसल्याने अनेकांनी आता एप्रिल महिन्यानंतर गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मजुर हळू-हळू गावाच्या दिशेने वाट धरत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम उद्योगांमधील उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. गॅस मिळवण्यासाठी दिवस-रात्र रांगेत उभे राहावे लागत असल्याने मजुरांना कामावरही गैरहजर राहावे लागत आहे. त्यामुळे रोजंदारीवर परिणाम होत आहे, अशी खंत यंत्रमाग मजूर अनिल विश्वकर्मा यांनी व्यक्त केली. आमच्याकडे शिधापत्रिका नसल्याने आम्हाला व्यवसायिक सिलिंडरचा आधार आहे. यापूर्वी आम्हाला आमच्या परिसरातील किराणा दुकानातून सुद्धा गॅस सिलिंडर मिळत होता. आता या परिस्थितीमध्ये गॅस न मिळाल्याने मोठी अडचण होत असल्याने नाईलाजास्तव गावी जावे लागणार असल्याचे सुरज यादव यांनी सांगितले.
मजुरांची व्यथा
तीन दिवसांपासून गॅस नाही; मुलांना बिस्किटांवर दिवस काढावा लागत आहे. – सरस्वती कुमारी, भिवंडी
चार दिवसांपासून रांगेत उभा आहे, तरी सिलिंडर मिळाला नाही. – पंकज सोनी, भिवंडी
उद्योगांवरही संकट
भिवंडी शहरात साडे चार लाख यंत्रमाग होते. मागील काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे दीड लाख यंत्रमाग कमी झाले. सध्या यंत्रमागांवर ४० हजारहून अधिक कामगार काम करतात. गॅस उपलब्ध होत नसल्याने हळू-हळू कामगार त्यांची गावी जाण्यास निघू लागले आहेत. – काॅ. सुनील चव्हाण, लाल बावटा यंत्रमाग कामगार फेडरेशन, महाराष्ट्र.
यंत्रमाग व्यवसायात काही साहित्य बनविण्यास गॅस लागतो. परंतु गॅस उपलब्ध होत नाही. कामगार देखील गॅस अभावी सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका यंत्रमाग व्यवसायिकाने सांगितले.
