ठाणे : मुस्लिम समाजाचा मोहरम हा सण शुक्रवारी साजरा केला जाणार असून या निमित्ताने भिवंडी शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी भिवंडी शहरात वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १ ते मिरवणुका संपेपर्यंत काम राहतील. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रांजणोली नाक्याकडून भिवंडी शहरात येणाऱ्या जड, मध्यम व हलक्या वाहनांना तसेच कार, रिक्षा आणि दुचाकींना रांजणोली नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. एसटी, केडीएमटी आणि टीएमटी बसगाड्यांसाठीही रांजनोली नाका येथे प्रवेश बंदी असेल. या वाहनांना रांजणोली नाका येथून मुंबई-नाशिक बाह्यवळण, मानकोली नाका, अंजूरफाटा, वसई रोड किंवा ओवळी खिंड मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
तसेच वाडा रोडमार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या जड – अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने नदीनाका मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पारोळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. जड अवजड वाहने अंबाडी येथून राष्ट्रीय महामार्ग ८ येथून किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवली फाटा, कांबारोड या पर्यायी मार्गाने वसईरोड, करवली येथून इच्छित स्थळी जातील, किंवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळण घेऊन गोरसईगाव मार्गे वाहतूक करतील.
वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धामणगाव- जांभोळी जलवाहिनी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धामणगाव जलवाहिनी मार्गे उजवे वळण घेऊन वाडा किंवा इच्छितस्थळी जातील. तर बसगाड्यांमधील प्रवाशांना चाविंद्रा नाका येथे उतरवतील आणि तेथूनच प्रवासी घेऊन पुढे वाहतूक करतील.
मुंबई, ठाणे येथून जुना ठाणे आग्रा रोड मार्गे भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड, अवजड आणि मध्यम आकाराच्या वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेशबंदी असेल. तर हलकी वाहने, एसटी, टीएमटी बसगाड्यांना नारपोली पोलीस ठाणे येथे प्रवेशबंदी असेल. जड अवजड वाहने वसई मार्गे कारीवली जकातनाका आणि विटभट्टी मार्गे वाहतूक करतील. एसटी, टीएमटी बसगाड्या प्रवाशांना पोलीस ठाण्याजवळ उतरवून तेथूनच प्रवाशांची पुन्हा वाहतूक करतील. मिरवणूक मार्गावर शांतीनगर ते कॉटरोट जकात नाका आणि भिवंडी नवीन एसटी स्टँड ते कॉटरोट जकात नाका या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
