ठाणे – भिवंडी महापालिकेची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कमी प्रमाणात कर वसुली होत असल्यामुळे आयुक्त अनमोल सागर यांनी गेल्यावर्षी नाराजी व्यक्त करत थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीसह नळ खंडीत करण्याची मोहिम राबविली होती. त्याचे सकारात्मक परिणाम यंदाच्या कर वसुलीत दिसू लागले असून यंदा पहिल्यांदाच १०३ कोटी ३१ लाखांची वसुली झाली आहे.

भिवंडी महापालिकेने गेल्यावर्षीच्या म्हणजेच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना ८११ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिलेले असतानाही सर्वच विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती. पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची ८७ कोटी ५४ लाखांची कर वसुली झाली होती. कर वसुलीचे उद्दीष्ट आणि त्यात अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या कर वसुलीच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त करत कर वसुलीवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीसह नळ खंडीत करण्याची मोहिम राबविली होती. त्याचे सकारात्मक परिणाम यंदाच्या कर वसुलीत दिसू लागले आहेत.

भिवंडी महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला १७१ कोटी ८४ लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. हे उद्दीष्ट पार करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. आयुक्त सागर यांच्या आदेशानुसार थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीसह नळ खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात आली. यात १३०० मालमत्ता जप्तीची नोटिस बजावण्यात आल्या तर, ५१४२ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. या कारवाईमूळे वसुलीचा आकडा वाढला आहे. यंदा १०३ कोटी ३१ लाखांची वसुली झाली आहे. ठरवून दिलेल्या उदीष्टापेक्षा हा आकडा कमी असला तरी, पालिकेने पहिल्यांदाच शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.

मालमत्ता कर विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०३ कोटी ३१ लाखांची कर वसुली केली आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात जास्त वसुली आहे. २०२२-२३ मध्ये ९१ कोटी ३७ लाख, २०२३-२४ मध्ये ७९ कोटी १५ लाख, २०२४-२५ मध्ये ८७ कोटी ५४ लाख इतकी वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटी ८० कोटी जास्त वसुली झाली आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

भिवंडी महापालिकेने जीआयएस सर्व्हेचे काम सुरू केले असून आतापर्यंत १२ हजार ९३५ मालमत्ताचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामुळे देखील कर वसुलीमध्ये वाढ होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यापुढे देखील जास्तीत जास्त कर वसुली करून थकबाकी शून्यावर आणावी अशा सुचना आयुक्त सागर यांनी दिल्या आहेत. तर, सर्व नागरिकांनी कर भरण्याची जबाबदारी पार पाडून शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापौर नारायण रतन चौधरी यांनी केले आहे.