ठाणे : भिवंडी महापालिकेत भाजपने नगरसेवक नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाने स्थापन केलेल्या ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’शी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापौर निवडीवरून भाजपमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. येत्या शुक्रवारी (दि. २० रोजी) ही निवडणूक होत आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी चौधरी यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र पक्षाने स्नेहा पाटील यांना संधी दिली. यामुळे चौधरी आणि त्यांचे समर्थक नाराज झाल्याने पक्षात नगरसेवकांचे दोन गट पडले. चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि शरद पवार गटाने स्थापन केलेल्या ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’शी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत नवी समीकरणे तयार झाली आहेत.

पक्षीय बलाबल भिवंडी महापालिकेत ९० सदस्यांपैकी भाजपचे २२, काँग्रेसचे ३०, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे १२, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे १२, समाजवादी पक्षाचे ६, कोणार्क विकास आघाडीचे ४, भिवंडी विकास आघाडी (एकता मंच) चे ३ आणि अपक्ष १ असे बलाबल आहे.

काँग्रेसलाही संधी?

नारायण चौधरी यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला पाठिंबा दिला तर काँग्रेसचा महापौर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीत भाजप विरुद्ध  काँग्रेस आणि शरद पवार गट अशी लढत झाली होती. आता महापौरपदावरून फाटाफूट सुरू आहे.