ठाणे: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगरला असून अग्निसुरक्षा यंत्रणा नसणे आणि आवश्यक ना-हरकत दाखला घेतला नसल्यामुळे कल्याण रोड परिसरातील दोन औद्योगिक आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून त्यांना सील करण्यात आले.

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाकडून शहरातील विविध आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी सुरू आहे. या तपासणीदरम्यान ज्या आस्थापनांकडे अग्निसुरक्षेची आवश्यक उपाययोजना आणि अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला नसल्याचे आढळले, त्यांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ (सुधारित २०२३) आणि नियम २०२५ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत १६ जुलै २०२६ रोजी कल्याण रोडवरील नारायण भोईर कंपाऊंड येथे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभाग, कुंभारवाडा पोलीस ठाणे आणि टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. यामध्ये मेसर्स एक्सेल इलेक्ट्रोकेम टेक्नॉलॉजी आणि मेसर्स क्रेस्कोनंट इंडिया प्रा. लि. या दोन औद्योगिक आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून आस्थापने सील करण्यात आली.

विदयुत पुरवठा खंडीत करणे, आस्थापना सिल करणे या प्रकारच्या कारवाईस सामोरे जायचे नसेल तर आपण महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन विभाग परवाना विभाग व करमूल्यांकन विभाग यांचेकडे संपर्क साधुन परवाना दाखले व घरपट्टी भरुन घ्यावी, असा इशारा महानगरपालिकेने सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांना दिला आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे, आवश्यक अग्निशमन परवाने, ना-हरकत दाखले तसेच परवाना विभाग व करमूल्यांकन विभागाकडील प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही केले आहे. अन्यथा नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर वीजपुरवठा खंडित करणे, आस्थापना सील करणे यासारखी कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.