Unauthorized Schools In Bhiwandi 2026: ठाणे जिल्ह्यातील शहरांचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असतानाच, त्याठिकाणी अनधिकृत इमारती उभ्या राहण्याबरोबरच अनधिकृत शाळा चालविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाने २१ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी शहरात १८ अनधिकृत शाळा सुरू होत्या, त्यात तीन शाळांची वर्षभरात वाढ झाली आहे. शाळा बंद करा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा पालिकेने शाळा प्रशासनाला दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात शासनाच्या मान्यतेविनाच काही संस्था अनधिकृतपणे शाळा सुरू करतात. या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयबी बोर्डांच्या नावाखाली आकर्षक जाहिराती केल्या जातात. त्याला भुलून पालक आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात. मात्र, अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा तसेच पालिका शिक्षण विभागाकडून शाळांची यादी जाहीर केली जाते. यंदाही ठाणे जिल्हा शिक्षण विभागापाठोपाठ भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाने २१ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.
शाळांवर गुन्हा दाखल करणार
शहरात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यांत आले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शासनमान्य शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली असून संबंधीतांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती भिवंडी पालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यांत आली आहे.
अनधिकृत शाळांची यादी
रॉयल इंग्रजी शाळा (पटेल कंपाउंड धामणकरनाका, भिवंडी), नोबेल इंग्रजी शाळा (अवचितपाडा, भिवंडी), अलरजा उर्दू प्राथमिक शाळा ( गैबी नगर भिवंडी), मराठी प्राथमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), द लर्निंग प्राथमिक शाळा (टेमघर पाडा भिवंडी), एकता इंग्रजी पब्लिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), एकता उर्दू पब्लिक शाळा (फातमा नगर नागांव भिवंडी), ए आर रेहमान उर्दू प्राथमिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर भिवंडी), विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा ( नवी वस्ती भिवंडी), डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा ( रावजीनगर, पॉवर हॉऊस जवळ, भिवंडी), अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा (पटेल नगर बाळा कंपाउंड, भिवंडी), तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा ( जैतनपुरा भिवंडी ), इकरा इस्लामिक मकतब शाळा (नदी नाका भिवंडी), कैसर बेगम इंग्रजी शाळा ( नागांव, साहारा होटल जवळ, भिवंडी), फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा (दिवान शाह दर्गा रोड भिवंडी ), गीतांजली माध्यमिक शाळा (गायत्रीनगर वऱ्हाळेदवी, भिवंडी ) या १८ शाळा अनधिकृत शाळांची यादी पालिकेने गेल्यावर्षी जाहीर केली होती. यंदाही या शाळा यादीत असून त्याचबरोबर ए.बी. इंग्रजी प्राथमिक शाळा (भैरव सायझिंग, समोर भिवंडी), विद्या निकेतन इंग्रजी प्राथमिक शाळा (भंडारी कम्पाऊंड, भिवंडी ), सरस्वती इंग्रजी प्राथमिक शाळा (नवीवस्ती भिवंडी) या तीन नवीन शाळांची वर्षभरात भर पडली आहे.
