scorecardresearch

ठाणे: गोवर प्रतिबंधक लसीकरणासाठी भिवंडी ‘पॅटर्न’ ठरतोय यशस्वी; गोवर तपासणीसाठी होणार विरोध घटला

भिवंडी शहरात गेल्याकाही दिवसांपासून गोवरची आजाराचा मोठ्याप्रमाणात उद्रेक झालेला आहे. परंतु या भागात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या.

ठाणे: गोवर प्रतिबंधक लसीकरणासाठी भिवंडी ‘पॅटर्न’ ठरतोय यशस्वी; गोवर तपासणीसाठी होणार विरोध घटला
गोवर प्रतिबंधक लसीकरण

भिवंडी शहरात गेल्याकाही दिवसांपासून गोवरची आजाराचा मोठ्याप्रमाणात उद्रेक झालेला आहे. परंतु या भागात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील काही मुस्लिम संघटनांना हाताशी धरून येथील मुस्लिम धर्मगुरु मौलानांची मदत घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेक नागरिक स्वत: मदरसे किंवा मशीदीच्या आवारातील शिबिरांमध्ये त्यांच्या मुलांना तपासणीसाठी घेऊन येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकारामुळे ७०० हून अधिक गोवर संशयित बालकांपर्यंत पोहचण्यास प्रशासनाला शक्य झाले आहे. तसेच घरोघरी सर्वेक्षण करताना होणारा विरोधही कमी झालेला आहे. त्यामुळे भिवंडीतील जनजागृती यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

मुंबई, ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही महिन्यांपासून गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सर्वाधिक रुग्ण असून या शहरातील तीन बालकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. भिवंडी शहरात महापालिकेकडून घरोघरी जाऊन बालकांचे सर्वेक्षण केले जात होते. परंतु नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नागरिकांचा विरोध होत असल्याने बालकांचे सर्वेक्षण करणेही कठीण जात होते. त्यामुळे रुग्णांपर्यंत महापालिका प्रशासनाला पोहचणे शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून भिवंडी महापालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली होती. त्यानंतर मशीदींच्या भोंग्याद्वारे तसेच मुस्लिम धर्मगुरूंच्या माध्यमातून बालकांचे लसीकरण आणि गोवर विषयी माहिती देण्यास सुरूवात केली होती. त्यास प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रशासनाने मुस्लिम संघटनांची मदत घेण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी

भिवंडीमध्ये मौलाना युसूफ रजा हे प्रतिष्ठित व्यक्ती मानले जातात. सध्या ते कामानिमित्ताने मदिनात वास्तव्यास आहेत. असे असले तरी भिवंडीतील बहुतांश धर्मगुरु त्यांच्या विषयी आदराच्या भावना व्यक्त करत असतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी काही चित्रफीत आणि फलक तयार केले. ते फलक भिवंडीतील धर्मगुरू त्यांच्या निकटवर्तियांना व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठविले. गोवर हा गंभीर आजार असून बालकांचे लसीकरण करावे असे आवाहन यात करण्यात आले. त्याचा परिणाम आता मागील काही दिवसांपासून दिसू लागला आहे. भिवंडीतील अनेक नागरिक स्वत: मशीदी, मदरसे येथील आरोग्य विभागाच्या शिबीरांमध्ये बालकांना लसीकरणासाठी आणत आहेत. पूर्वी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरोघरी सर्वेक्षणासाठी गेल्यास नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आता १५ पैकी किमान १२ घरांमध्ये नागरिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत आहे. महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामुळे प्रशासनाला आतापर्यंत ७०० हून अधिक संशयित रुग्णांचा शोध घेणे शक्य झाले आहे.

गेल्याकाही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु धर्मगुरुंच्या माध्यमातून प्रचार केल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती वाढू लागली आहे. लवकरच आम्ही गोवर रुग्णसंख्या आटोका आणू. – डाॅ. बुशरा सय्यद, वैद्यकीय अधिकारी, भिवंडी महापालिका.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:08 IST

संबंधित बातम्या