शहरातील काही भागांत २० टक्के पाणीकपात

ठाणे : पाण्याचा वाढलेला वापर आणि धरणांतील खालावलेली पाणीपातळी यांमुळे मुंबई महापालिकेने मुंबईत लागू केलेल्या पाणीकपातीचा थेट परिणाम भिवंडी महापालिका क्षेत्रातील भागांवर दिसून येत आहे. भिवंडीतील काही भागांसाठी जलस्रोत असलेल्या मुंबई महापालिकेने पाणीकपात लागू केल्याने भिवंडी महापालिकेने बुधवारपासून २० टक्के पाणीकपात लागू केली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १६ लाखांच्या घरात गेली असून या क्षेत्रामध्ये विविध स्रोतांमार्फत दररोज ११५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये मुंबई महापालिकेकडून ४० दशलक्ष लीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ७३ दशलक्ष लिटर आणि भिवंडी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील वराला तलावातून दोन दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मुंबई महापालिका आणि स्टेम प्राधिकरण हे दोन्ही स्रोत शहरांतील पाणीपुरवठय़ाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. यंदा मुंबई महापालिकेच्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात मुंबई महापालिकेकडून इतर शहरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही करण्यात आली असून त्याचा फटका भिवंडी शहराला बसला आहे. त्यामुळे या स्रोतामार्फत भिवंडी शहरातील ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या भागातील पाणीपुरवठय़ात २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय भिवंडी महापालिकेने घेतला असून त्याची अंमलबजावणी ५ ऑगस्टपासून सुरू केली आहे, अशी माहिती भिवंडी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी दिली.

या भागामध्ये पाणीकपात

भिवंडी महापालिका क्षेत्रातील शांतीनगर, भिवंडी शहराचा जुना भाग, क्वाटरगेट मशीद, हंडी कम्पाऊंड, इदगा रोड, रोशन बाग, पद्मानगर आणि भादवडचा काही भाग या परिसरात मुंबई महापालिका स्रोतामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. या सर्वच भागांमध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तर उर्वरित भागांमध्ये मात्र पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती भिवंडी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी दिली.