रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन; प्रवाशांचे हाल

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य मागण्यांसाठी भिवंडीतील रिक्षा संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी संपूर्ण शहरातील रिक्षा वाहतूक बंद होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. बंददरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही रिक्षांच्या काचा आंदोलकांनी फोडल्याची चर्चा आहे. मात्र, रिक्षा संघटनांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसेच  येत्या ३० नोव्हेंबरला भिवंडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.

भिवंडी शहरामध्ये २० ते २५ हजार रिक्षा असून त्या शेअर पद्धतीने चालविण्यात येतात. या चालकांनी मंगळवार मध्यरात्रीपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गासह विद्यार्थ्यांचे हाल झाले. भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी आंदोलनादरम्यान केली आहे. टिएमटी, केडीएमटी आणि खासगी वाहनामार्फत भिवंडी शहरातून सुरु असलेली वाहतूक बंद करण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच रिक्षा पासिंगसाठी तुर्भे येथे जावे लागत असल्याने हि सुविधा भिवंडीत उपलब्ध करावी आणि नवीन रिक्षा परवाने बंद करावेत अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य होण्यासाठी रिक्षाचालकांनी मंगळवार रात्रीपासून शहरात रिक्षा बंद आंदोलन सुरु केले असून बुधवार सायंकाळपर्यंत चालकांचे आंदोलन सुरु होते. या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच राज्य परिवहनच्या जादा बस फेऱ्याही सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्रवाशांना हाल सोसावे लागले.

परिवहनलाही विरोध

भिवंडी शहरातील बहुतांश हातमाग आणि यंत्रमाग कारखाने मंदीमुळे बंद झाले असून त्याचा परिणाम रिक्षा प्रवासी वाहतूकीवरही झाला आहे. ठाणे परिवहन उपक्रमाची बससेवा नारपोलीपर्यंत तर केडीएमटीची बससेवा कल्याणफाटावरील गोपाळनगपर्यंत सुरु होती. या दोन्ही उपक्रमांनी आता शिवाजी चौकापर्यंत बससेवा सुरु केली आहे. तसेच खासगी बस आणि जीपमधूनही प्रवाशांची वाहतूक होत आहे. त्यामुळे रिक्षा प्रवासी संख्येत घट होऊन उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्षाच्या कर्जाचे हप्तेही भरणे शक्य होत नसल्याने ही सेवा बंद करण्याची मागणी केल्याची माहिती भिवंडी तालुका रिक्षा महासंघाचे महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली.