ठाणे : भिवंडीतील राहनाळ गावाजवळ महिलेच्या डोक्यावरून मागून येणाऱ्या ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला रस्त्यावरील खड्डा कारणीभूत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्या, तरी अपघात खड्ड्यामुळेच झाला, अशी नोंद प्रथम खबरी अहवालात (एफआयआर) नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता अच्छेलाल पाल (वय ४६) असे मृत महिलेचे नाव असून त्या ठाण्यातील मनोरमानगर परिसरात वास्तव्यास होत्या. रविवारी दुपारी त्या पती अच्छेलाल पाल यांच्यासोबत दुचाकीवरून भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात जात होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी राहनाळ परिसरात पोहोचली असता मागून येणाऱ्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली.
या धडकेमुळे सुनिता पाल रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. या अपघातात अच्छेलाल पाल हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात सुनिता गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अच्छेलाल पाल यांच्या चुलत भावाने नारपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते आणि रस्त्यावर मोठा खड्डा असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, अपघाताच्या प्राथमिक नोंदीत किंवा अहवालात खड्ड्याचा उल्लेख नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
