ठाणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकराम मुंढे यांच्या पथकाकडून राज्यभरात भेसळयुक्त अन्न पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, पान मसालाविरोधात कारवाई सुरू असतानाच, भिवंडी येथील खंडूपाडा परिसरातील एका शोरमा दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तब्बल ८० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर, महापालिकेने संबंधित दुकानावर बुलडोझर चालवत कारवाई केली असून, अन्न व रुग्णांच्या उलटीचे नमुने घेऊन अन्न व औषध प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
भिवंडीतील खंडूपाडा परिसरात ”फेमस शोरमा” नावाचे दुकान आहे. या दुकानात गुरूवारी आसिफ अमीन सय्यद आणि त्यांचा मित्र शहाबाज अन्सारी यांनी शोरमा आणि पिझ्झा खाल्ला. त्यानंतर त्यांनी शोरमा आणि पिझ्झा पार्सल घेऊन तो घरी नेला. त्यांच्या कुटूंबियांनीही तो खाल्ला. यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास झाला. प्राथमिक उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यामुळे संबंधितांना शुक्रवारी भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट केल्याने आसिफ यांनी शांतीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सुरूवातीला विषबाधा झालेल्यांचा आकडा ७ ते ८ इतका होता. मात्र, शुक्रवार सकाळपासून त्यात वाढ होऊ लागली आणि सायंकाळी उशीरापर्यंत तो ८० वर पोहचला. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले असून त्यापैकी १२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, उर्वरित नागरिकांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आसिफ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणी फेमस शोरमा दुकानाचा मालक दिलशाद याकूब अन्सारी (२७) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ आणि २७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भिवंडीत एकच खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि अनधिकृत खाद्य व्यवसायांवर नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नमुने तपासणी घेतले
भिवंडीतील खंडूपाडा परिसरात ”फेमस शोरमा” दुकानातील शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर ८० जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला असून या सर्वांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अन्न पदार्थातून विषबाधा झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले असून यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवून अन्न व रुग्णांच्या उलटीचे नमुने घेऊन तपासणी करण्यास कळविले होते. त्यानुसार त्यांनी नमुने घेऊन तपास सुरू केला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
दुकानावर बुलडोझर
विषबाधा घटनेची गंभीर दखल घेत भिवंडी-निजामपूर महापालिकेने शनिवारी संबंधित शोरमा दुकानावर बुलडोझरद्वारे कारवाई केली. या दुकानाचे शेड पालिकेने तोडून टाकण्याची कारवाई केली.
