ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची ६ मार्चला तिथी प्रमाणे जयंती साजरी केली जाणार आहे. या जयंती निमित्ताने भिवंडीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची भिवंडीत दरवर्षी तिथी प्रमाणे जयंती साजरी केली जाते. ६ मार्चला भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरात वाहतुक बदल लागू केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वंजारपट्टी नाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कोंबडपाडा, संगमपाडा, मेट्रो उपाहारगृह, वंजापट्टी नाका येथे वाहतुक करतील.

तर वंजारपट्टी नाका येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वंजारपट्टी नाका आणि वंजारपट्टी पूल येथे प्रवेश बंदी असेल. येथील राज्य परिवहन सेवेच्या (एसटी), टीएमटी, केडीएमटी बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी थांब्याजवळ बसगाडीतून उतरविले जाईल. तर इतर वाहने वंजारपट्टी नाका येथून वळसा घालून वाहतुक करतील. हे वाहतुक बदल ६ मार्चला सायंकाळी ४ ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू असतील.