ठाणे: भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज (शक्तिपीठ) यांचे मंदीर वर्षभरापुर्वी उभारण्यात आले असून महाराजांचे राज्यातील हे पहिलेच भव्य मंदीर आहे. या मंदिराला महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे येथील पर्यटनासह रोजगाराला चालना मिळणार आहे.

शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदीर उभारण्यात आले आहे. या सर्व मंदिराची रूपरेखा ह.भ.प डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तुविशारद विजयकुमार पाटील भिवंडी यांनी केली आहे. मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे पहिलेच भव्य मंदीर असावे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे.

या मंदिरात शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुमारे ४ एकर जागेत हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराची भव्य रचना, किल्ल्यासारखी तटबंदी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आणि स्वराज्य स्थापनेतील शिवकालीन इतिहास दर्शविणारे शिल्पफलक येथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विविध शाळांच्या शैक्षणिक सहली येथे येत आहेत.

वाढत्या पर्यटक संख्येमुळे या ठिकाणाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने या स्थळाला ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे. हा मानास्पद दर्जा मिळवण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा एखाद्या शक्तिपीठाला थेट ‘ब’ दर्जा प्राप्त झाले आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली, असे राजू चौधरी यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शक्तिपीठाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या मान्यतेमुळे राज्यभरातील पर्यटक आणि शिवभक्तांचे आर्कषण या शक्तिपीठाकडे अधिक वाढण्याची अपेक्षा आहे, असेही चौधरी म्हणाले.

असे आहे मंदिर

गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिराच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट आहे. तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे, हे मंदीर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. हे मंदीर हुबेहुब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे. तसेच मंदिर प्रवेशद्वार उंची ४२ फूट असून एकूण पाच कळस, गाभाऱ्यावर ४२ फूट सभा मंडप, सभा भोवती चार कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारणी करण्यात आली आहे. तटबंदीच्या आत ३६ विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून इतिहास दर्शन घडविण्यात येत आहे. सर्व खांब कोरीव, महिरपी कमानी आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साडे सहा फूट असून ती अयोध्यातील रामाची मूर्ती घडविणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे.