भिवंडी : शासकीय कार्यालयांपर्यंत नागरिकांनी जाण्याऐवजी प्रशासनच नागरिकांच्या दारात पोहोचावे, या संकल्पनेतून भिवंडी तहसील प्रशासनाने देखील घोंगडी बैठक या लोकाभिमुख उपक्रमाची सुरुवात केली आहे. या बैठकीत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शासकीय योजनांची माहिती देत देण्यात आली.
नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या समस्या गावपातळीवरच ऐकून त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने ‘घोंगडी बैठक’ या उपक्रमाला सुरूवात केली. शहापूर तालुक्यात या उपक्रमाला मिळालेल्या यशानंतर आता भिवंडी तालुक्यातही त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत तहसील प्रशासनातील अधिकारी कोणत्याही औपचारिकते शिवाय थेट गावात जाऊन घोंगडीवर बसत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, महसूल विषयक प्रश्न, प्रलंबित वनहक्क दावे आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक तक्रारींची जागेवरच दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नसून, प्रलंबित कामांना गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
या बैठकीला भिवंडीचे तहसीलदार अभिजीत खोले, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, अतुल नाईक, किरण केदार, भिवंडी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शेलार मंडळ अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनीही उपस्थित राहून आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.
दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या माजी उपाध्यक्षा संगीता भोमटे तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे भिवंडी तालुका अध्यक्ष, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य (गाणे–फिरंगपाडा) गोरख पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले. नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या महसूल प्रशासनाच्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले.
