ठाणे : भिवंडी येथील सलाहुद्दीन आयुबी मेमोरीयल उर्दु हायस्कुल या शाळेत विद्यार्थ्यांकडून कार्यानुभव या सदराखाली नियमबाह्य शैक्षणिक शुल्क वसुल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करुन मुख्याध्यापिकेसह तिघांना ताब्यात घेतले.

मुख्याध्यापिका अतिया खान (५६), संगणक शिक्षक रिझवान खान (३१) आणि खासगी लिपीक आस्मा शेख (४७) अशी लाच प्रकरणात ताब्यात असलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शांतीनगर येथे सलाहुद्दीन आयुबी मेमोरीयल उर्दु हायस्कुल ही शाळा आहे. भिवंडीतील जुन्या शाळांपैकी एक विद्यालय आहे.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासकीय नियमानुसार कोणतेही शुल्क आकारले जात नाही. असे असतानाही नियमबाह्यपद्धतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया खान आणि आस्मा हे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज देताना चार हजार रुपये शुल्क असल्याचे सांगत होते. यातील तीन हजार रुपये वेगवेगळ्या कार्यानुभवासाठी तर एक हजार रुपये परतावा शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

याबाबतची तक्रार एका पालकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार आणि पंच यांच्या समक्ष विभागाने पडताळणी केली असता, तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार सोमवारी दुपारी पथकाने सापळा रचून चार हजार रुपयांची लाच घेताना अतिया, रिझवान आणि आस्मा यांना हातोहात पकडले. याप्रकरणात तिघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.