ठाणे : भिवंडी शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा गेल्या शनिवारी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आला असतानाच, त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेकडून शहराला होणारा पाणी पुरवठा येत्या शनिवारी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आठवड्या भरात दुसऱ्यांदा पाणी कपात लागू झाल्याने भिवंडीकरांपुढे जलसंकट उभे राहिले आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन स्त्रोतांमार्फत दररोज १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून ७३ दशलक्षलीटर, मुंबई महापालिकेडून ४२ दशलक्षलीटर आणि वऱ्हाळदेवी तलाव पाणी योजनेतून ५ दशलक्षलीटर इतके पाणी पुरवठा करण्यात येतो. हे तिन्ही स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचे मानले जातात. असे असले तरी विविध कारणांमुळे शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते.

त्यात प्रमुख्याने जलवाहीनीवरील गळती रोखण्याबरोबरच देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. या बंदनंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या निर्माण होते. अशाचप्रकारे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनाला आठवड्याभरात दोनदा पाणी पुरवठा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. भिवंडी शहराला स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा शनिवार ११ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ एप्रिल रोजी सकाळी ९

असा चोवीस तास बंद ठेवण्यात आला होता. पावसाळ्यापुर्वीच्या दैनदिन देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या बंदनंतर पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी तो कमी दाबाने होत आहे. असे असतानाच, आता मुंबई महापालिकेकडून शहराला होणारा पाणी पुरवठा शनिवार १८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते रविवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ९ असा चोवीस तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्य जलवाहीनी जोडणीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदनंतर पुढील एक दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप पटणावर यांनी दिली.

कोणत्या भागात पाणी नाही

बिलालनगर, संजयनगर, के.जी.एन. चौक रेहमतपुरा-१, रेहमतपुरा-२, गोविदनगर, नदीपार, पिराणीपाडा, टीचर कॉलनी, अजय हॉटेल, अमजदीया शाळा, गणेश सोसायटी, गुलजारनगर, अनंद टॉकीज, सुभाष नगर, खान कंम्पा, अन्सार नगर, बंदा नवाज मस्जिद, अपना हॉस्पीटल, सत्तार टेकडी व कचेरीपाडा, वफा कॉम्पलेक्स, किडवाई नगर, फंडोले नगर, गैबीनगर, भाजी मार्केट, सहयोगनगर, मुमताजनगर, टिपू सुलतान रोड, कचेरीपाडा व संपूर्ण शांतीनगर या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.