ठाणे : भिवंडीकरांना पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आता पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पाण्याची बचत करण्यासाठी स्टेम कंपनीकडून दर बुधवारी घेण्यात येणारा १८ तासांचा बंद रद्द करण्यात आला असून, आता दर सोमवारी सकाळी ९ ते मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून १८ तास बंद राहणार आहे.

राज्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जलाशयांमधील पाण्याची पातळी घटली आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १० टक्के पाणी कपात करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शासनाने किमान १० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. स्टेम कंपनीकडून दर बुधवारी घेण्यात येणारा १८ तासांचा बंद रद्द करून आता दर सोमवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे.

स्टेम कंपनीमार्फत भिवंडी शहराला पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वी दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी स्टेम कंपनीच्या अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत पाणी बंदच्या दिवसांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता दर सोमवारी सकाळी ९ वाजता पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल.

या कालावधीत स्टेम कंपनीमार्फत होणारा भिवंडी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, पाणी बंदच्या सुधारित वेळापत्रकाची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन भिवंडी महापालिकेचे प्रभारी कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) संदीप पटणावर यांनी केले आहे.