भुईगाव समुद्रकिनारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात
वसई : किनाऱ्याची होणारी धूप व किनारपट्टीच्या भागांचे लाटांपासून संरक्षण व्हावे यासाठी वसईच्या किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याचे काम पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. अखेर भुईगाव समुद्र किनारी धूपप्रतिबंधक बंधारे उभारणीला मुहूर्त सापडला असून पतन विभागाकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
वसईच्या भागातील भुईगाव हा किनारपट्टीचा परिसर आहे. या किनाऱ्यालगतच स्थानिकांची मोठी वस्ती असून पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात या किनारपट्टीच्या भागात मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांनाही बसत आहे. त्यातच बेसुमार वाळू उपसा, कचरा, किनाऱ्यालगत असलेली सुरुची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट होऊ लागली आहेत. तर दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्र किनाऱ्यावरील विविध भागात घुसून किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती व इतर किनारपट्टीच्या भागाचे मोठे नुकसान होत असते. यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे तयार व्हावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
या मागणी नुसार अर्नाळा किल्ला, कळंब रानगाव, भुईगाव, अर्नाळा गाव आदी ठिकाणच्या भागात राज्य शासनाच्या पतन विभागाने धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याचे काम मंजूर केले आहे. त्यानुसार इतर बंधाऱ्यांच्या कामासोबतच सध्या स्थितीत भुईगाव येथील १०० मीटर लांबीचा बंधारा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे. मध्यंतरी करोनाकाळ सुरू असल्याने या बंधाऱ्याचे काम थांबले होते. आता सर्व काही पूर्वपदावर येत असल्याने या बंधाऱ्याचे काम ही प्रगतिपथावर असल्याची पतन विभागाकडून देण्यात आली आहे.
परवानगी मिळताच कामाला गती
सुरुवातीला धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्याचे काम मेरी टाइम बोर्डाकडे होते. परंतु सन २०१४-१५ पासून हे काम पतन विभागाकडे सोपविण्यात आले होते. परंतु धूपप्रतिबंधक बंधारे तयार करताना सीआरझेड, टीएस परवानगी असे प्रस्ताव टाकूनही त्यास हिरवा कंदील मिळत नव्हता. त्यामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. २०१९ पासून परवानगी मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून हळूहळू धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पतन विभागाने दिली आहे.
भुईगाव येथील धूपप्रतिबंधक बंधारा तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. – कल्पेश सावंत, उपकार्यकारी अभियंता पतन विभाग
