ठाणे : ठाणे शहराहसह दिवा परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामांमागे मोठी टोळीच कार्यरत आहे. बेकायदा बांधकामे रोखण्याच्या कामासाठी ज्यांना नेमतात, तेच बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. बांधकामांचे हित जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वशेलीबाजीतून अशा अधिकाऱ्यांची निवड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली होती. ही कारवाई थंडावताच भूमाफियांनी पुन्हा बेकायदा बांधकामे उभारण्यास सुरुवात केली. दिवा भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप होत असून त्याचबरोबर शहरातही बेकायदा बांधकामे होत असल्याची ओरड आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयुक्त डॉ. शर्मा हे ठाणे शहराचे दौरे करीत असून त्यामध्ये त्यांना बेकायदा बांधकामे दिसत नाहीत का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी केली. या भेटीनंतर आमदार केळकर आणि डावखरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. शहरातील १०० बेकायदा बांधकामांची यादी पालिका आयुक्तांना लवकर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवा नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामांमागे मोठी टोळीच कार्यरत आहे. दिवा येथे आमदार निधीतून उभारलेले ई-शौचालयाचे बांधकाम तोडण्यात आले. पण, त्यासमोरच सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी टीका केळकर यांनी केली. तसेच बेकायदा बांधकामे रोखण्याच्या कामासाठी ज्यांना नेमताय, तेच बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. या प्रकारामुळे ठाण्यातील जनता आता रस्त्यावर उतरेल. बेकायदा बांधकामांबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे, असेही ते म्हणाले.
‘कुंपणच शेत खातंय!’
दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत, परंतु महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा नेहमी होते. काही हितसंबंधी व्यक्तींची बांधकामे वाचविण्यासाठी बिल्डरांना कारवाईची आगाऊ खबर दिली जाते. त्यामुळे बडी बांधकामे वाचविली जातात, तर किरकोळ बांधकामांवर कारवाईचा देखावा निर्माण केला जातो. या आरोपांना दुजोरा देणारी एक ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. या ध्वनिफितीवरून कुंपणच शेत खातंय, असा आरोप भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केला. आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन अनधिकृत बांधकामे बंद करण्याचा आदेश देणारी ती महिला अधिकारी कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ही ध्वनिफीत पेन ड्राइव्हच्या माध्यमातून आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली असून या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही केली आहे, असेही ते म्हणाले.