ठाणे – महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला आणि प्रचंड लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली समाजात चुकीचे संदेश पोहोचू नयेत, अशी अपेक्षा असताना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉस मराठीच्या २५व्या भागात कलाकारांची “नजर उतरविण्याचा” अंधश्रद्धायुक्त प्रकार दाखवण्यात आला. या दृश्यात काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून थेट गॅसवरील तव्यावर टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. या प्रसंगामुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांनी कलर्स मराठी वाहिनीने जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचे दृश्य प्रसारित होणार नाहीत याची खात्री द्यावी, अशी मागणी केली आहे.

कलर्स मराठी या वृत्त वाहिनीवर सध्या बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाचा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे. सध्या या कार्यक्रमाचा सहावा सिझन सुरू असताना घडलेल्या या प्रकारावर अंनिसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अंनिसच्या मते हा प्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो सरळसरळ अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा आहे. विशेषतः लहान मुले, तरुणाई आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पाहत असल्याने अशा दृश्यांचा सामाजिक परिणाम दूरगामी ठरू शकतो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात अंनिसने वाहिनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले असून, चूक तात्काळ दुरुस्त करून येणाऱ्या भागांमध्ये याबाबत स्पष्ट खुलासा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यां यांनी माहिती देताना सांगितले की, प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा बळावू नये यासाठी वाहिनीने सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध करणे अत्यावश्यक आहे. तसेच भविष्यात अंधश्रद्धायुक्त प्रसंग टाळून उलट वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे आणि समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम सादर करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निवेदनात आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यात आली असून, कार्यक्रमाचे दिग्दर्शक तसेच निवेदक रितेश देशमुख यांच्या लक्षात हा प्रकार न येणे किंवा त्याचे गांभीर्य न समजणे ही चिंताजनक बाब असल्याचे अंनिसने नमूद केले आहे. इतक्या मोठ्या व्यासपीठावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडून सामाजिक जबाबदारीची अपेक्षा असते. मात्र अशा दृश्यांमुळे चुकीच्या समजुतींना खतपाणी मिळते आणि अंधश्रद्धेला अप्रत्यक्ष मान्यता मिळते, असा ठपका अंनिसने ठेवला आहे.

एकूणच, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा पसरवणारे दृश्य दाखवले जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत अंनिसने तीन ठोस मागण्या पुढे ठेवल्या आहेत. अंधश्रद्धायुक्त प्रसंगाबद्दल जाहीर दिलगिरी, येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट निवेदन आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रसारण टाळण्याची ठोस हमी. आता या प्रकरणावर कलर मराठी वाहिनी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.