ठाणे : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्राचे वाटप करत असताना एका महिला डॉक्टराचा हिजाब खेचला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर टीका करत आहेत. ठाणे शहरातही या प्रकरणाचे पडसाद उमटतले आहेत. नितीश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्री सचिवालयाने १००० आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्रतिकात्मक स्वरुपात काही निवडक डॉक्टर्सना खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्रे दिली जाणार होती. त्यानुसार एक मुस्लिम महिला डॉक्टर प्रमाणपत्र घेण्यास पुढे आली.यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या डॉक्टर महिलेने परिधान केलेला हिजाब खेचण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार यांना लक्ष्य केले. राजकारणा व्यतिरिक्त कलाविश्वातूनही यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वासिमने तसेच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही याप्रकरणावर भाष्य केले आहे.
या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात देखील उमटले आहे. ठाणे शहरातील लब्बैक फाऊंडेशनच्या नगमा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नितिश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेले कृत्य अत्यंत अनुचित, अपमानास्पद आणि महिलांच्या सन्मानास धक्का देणारे आहे. एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून असे वर्तन होणे म्हणजे समाजातील इतर लोकांनाही अशा प्रकारच्या गैरवर्तनास प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
आम्ही स्वत: मुस्लिम महिला असून परदा हा आमच्या धार्मिक आणि संस्कृतीचा आहे. त्यामुळे एका सार्वजनिक कार्यक्रमात एका महिलेच्या अंगावर हात टाकणे आणि तिचा हिजाब खेचणे ही धक्कादायक घटना असून आम्ही महिला म्हणून या कृत्याचा विरोध करतो, असे मत या निदर्शनात सहभागी असलेल्या महिलांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
