ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले असतानाच, या मार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या अपघातात प्रवेश राठोड (२७) यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांचा मित्र सुरेंद्र गुप्ता (२६) हा गंभीर जखमी झाले. अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोलशेत येथील मनोरमानगर परिसरात सुरेंद्र गुप्ता वास्तव्यास आहेत. तर प्रवेश हे बदलापूर येथे राहण्यास होते. त्यांच्या एका मित्राच्या मुलाचा ७ सप्टेंबरला वाढदिवस होता. यानिमित्ताने ते त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. मित्राच्या घरी पाहुणे असल्याने मध्यरात्री पर्यंत सुरेंद्र आणि प्रवेश मित्राला मतदीसाठी त्यांच्या घरी थांबले होते. ८ सप्टेंबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले. भाईंदरपाडा भागात प्रवेश यांचे काही काम होते. त्यामुळे सुरेंद्र आणि प्रवेश दुचाकीने भाईंदरपाडा येथे गेले. त्यावेळी सुरेंद्र हे दुचाकी चालवित होते. प्रवेश यांचे काम आटोपल्यानंतर सुरेंद्र हे त्यांना ठाणे स्थानकाच्या दिशेने सोडण्यासाठी जात होते. ते भाईंदरपाडा येथील सेवा रस्त्यावरून मुख्य वाहिनीवर येत असताना एका अवजड वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्याचवेळी मागून बेदरकारपणे येणाऱ्या आणखी एका अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अवजड वाहनाचे पुढील चाक सुरेंद्र यांच्या हातावरून आणि प्रवेश यांच्या डोक्यावरून गेले.
प्रवेश यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव झाला होता. सुरेंद्र हे काहीकाळ बेशुद्ध पडले. काहीवेळाने शुद्धीत आल्यानंतर त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडे मदतीसाठी विनवणी केली. परंतु कोणीही वाहन चालक त्यांच्या मदतीला थांबले नाही. सुमारे अर्धा तास ते मदतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांनी त्यांच्या भावाला संपर्क साधला. काहीवेळाने सुरेंद्र यांचा भाऊ घटनास्थळी आला. त्यानंतर कासारवडवली पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. प्रवेश यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दाखल करण्यापूर्वीच प्रवेश यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. या अपघाता प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.