ठाणे- येथील कापूरबावडी पुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक च्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. कापूरबावडी पुलाजवळ असलेल्या सिनेवंडर मॉल च्या समोरील रस्त्यावरून रविवारी रात्री एक अज्ञात ट्रक चालक प्रवास करत होता.
या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एक रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाली होती. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आली आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः मोकळा करण्यात आला आहे.