कल्याण – अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचे प्रभावीपणे वापर, पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या आदेशाप्रमाणे कल्याण मधील बी. के. बिर्ला महाविद्यालयाने महाविद्यालय आवारात औषधी वनस्पतींसह दुर्मिळ वनस्पतींचे जैवविविधता उद्यान विकसित केले आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर वनराईने फुलून गेला आहे.
बी. के. बिर्ला महाविद्यालयात १३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. वनस्पती, जीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरात ५५० विविध प्रकारची रोपे आणि सोळाशेहून अधिक कुंडीतील रोपांची लागवड करण्यात आली आहे. महाविद्यालय आवरातील अनेक वर्षाच्या जुनाट झाडांचे संवर्धन या उपक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे.
महाविद्यालय आवारात पावसाळ्यात इमारतींवरून पडणारे पाणी तळ टाक्यांमध्ये साठवून जलसंचय केला जातो. वातानुकूलित यंत्रातून बाहेर ठिपकणाऱ्या पाण्याचा थेंब फुकट घालविला जात नाही. इमारतींच्या गच्चीवर सौर उर्जा पट्ट्या बसवून त्या माध्यमातून हरित उर्जा निर्माण केली जाते. महाविद्यालय आवारातील कुपनलिकांमध्ये पावसाचे पाणी जिरवून जलपुनर्भरण करण्यात येते. जलसंचय आणि जलपुनर्भरण योजनेतील पाणी प्रक्रिया करून झाडे, स्वच्छता गृहांसाठी वापरले जाते.
बिर्ला महाविद्यालय परिसरात अर्जुन, हादगा, ताम्हण, बकुळ, कडुनिंब, उंबर, बेल, पिंपळ, वड, बहावा, निलगिरी, सुरू, सुबाभुळ, अडुळसा, निर्गुडी, अश्वगंधा, शतावरी, दमवेल, इन्सुलिन वनस्पती लावण्यात आल्या आहेत. चार हजार २५४ चौरस मीटर क्षेत्रावरील जैवविविधता उद्यानामुळे महाविद्यालय परिसरात हरितपट्टा तयार झाला आहे. महाविद्यालयाच्या इमारतींवर गच्चीवरील बाग फुलविण्यात आली आहे. याशिवाय भाजीपाला लागवड केली जात आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व कळावे हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे महाविद्यालय व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या आवारातील कचरा महाविद्यालयातच प्रक्रिया करून विल्हेवाट लावला जातो. महाविद्यालयात बियाणा बँक आहे. २५० हून झाडांच्या बियांचे जतन या बँकेत करण्यात आले आहे. सुक्या कचऱ्यापासून तयार झालेले खत आवारातील झाडांसाठी वापरले जाते. नागरिकांनाही या वृक्षारोपण, हरित क्रांतीचे महत्व कळावे म्हणून नेचर क्लबतर्फे निसर्ग भ्रमंती उपक्रम राबविला जातो. महाविद्यालयाच्या या पर्यावरण संवर्धन उपक्रमाबद्दल व्यवस्थापनाला अनेक संस्थाकडून हरित संवर्धनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.