हळदीकुंकू कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये रुसवेफुगवे!

महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी डोंबिवलीतील आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची आखणी करताना सत्ताधारी शिवसेनेने इतर पक्षांना अंधारात ठेवल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला असून हळदीकुंकवाच्या निमित्ताने या दोन पक्षात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. या कार्यक्रमासाठी किती खर्च झाला तसेच यासंबंधीचा ठराव कधी मंजूर झाला याविषयी माहिती नसल्याचा आरोपही भाजपच्या नगरसेविकांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी डोंबिवलीतील आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी करण्यात आली नसल्याने महिलांची उपस्थिती मोजकीच होती. यामुळे भरमसाट खर्च करून आणलेल्या भेटवस्तू परत पाठविण्यात आल्या. अचानक हा कार्यक्रम आयोजित केल्याने त्यास पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही अशी टीका आता होऊ लागली आहे. महापालिकेकडून मिळणारा निधी परत जाऊ नये म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला का, अशी चर्चाही आता रंगली आहे. याविषयी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुशीला माळी यांना विचारले असता त्यांनी, तीन ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगतिले. यासंबंधीचा ठराव उशिराने झाल्याने कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ हळदीकूंकू नाही तर समाजप्रबोधन म्हणून आम्ही कचरा निर्मूलनाविषयीही जनजागृती करत आहोत, असा दावाही त्यांनी केला.
भाजप सदस्य अनभिज्ञ
या आयोजनावरून शिवसेना-भाजपमधील दरी पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून अशाप्रकारे काही कार्यक्रम आयोजित केला जात आहे याविषयी आपणास काहीच माहीत नाही, असे भाजमधील काही नगरसेविकांनी सांगितले. आम्हाला कार्यक्रमाचे सरळ आमंत्रणच देण्यात आले. ठराव कधी मंजूर झाला आणि असा कार्यक्रम घ्यायचा आहे याविषयी काही बैठकही झाली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. याविषयी पालिकेचे साहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी अंदाजे साडेपाच लाखाचा खर्च या कार्यक्रमाला आला असेल असे सांगून अधिकृत आकडा माहीत नाही, असेही स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp allegation on shiv sena for keeping blind about haldi kumkum festival