बदलापूर : बदलापूर शहरात दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणात तक्रार देण्यास असमर्थता दाखवल्याने आरोपी केलेले संस्थेचे तत्कालीन सचिव तुषार आपटे यांना भाजपने स्विकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यांची निवड झाली. त्यात भाजपच्या दोन, शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. यात भाजपने संधी दिलेल्या सदस्यांमध्ये तुषार आपटे यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बदलापूर शहरासह राज्याला हादरवणाऱ्या दोन चिमुकल्या मुलांच्या लैंगिंक अत्याचार प्रकरणाने शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव यांनाही आरोपी करण्यात आले होते. बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तक्रार देण्यास असमर्थ ठरल्याच्या २१ (२) या कलमाखाली शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा तथाकथित चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून मोठे राजकारणही रंगले होते. यात संस्थेचे सचिव तुषार आपटे हे ४४ दिवसांनी पोलिसांच्या हाती लागले होते. त्यांना त्यानंतर ४८ तासात जामिनही मिळाला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयाच्या अधिन आहे.
याच तुषार आपटे यांना आता भाजपने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यपदी नियुक्त केले आहे. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार) पक्षाच्या युतीचे तीन तर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन सदस्य नियुक्त झाल्याची घोषणा नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केली. यात भाजपकडून शागोफ गोरे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेनेने दिलीप बैकर आणि पराभूत उमेदवार हेमंत चतुरे यांना संधी दिली आहे.
तुषार आपटे यांच्या निवडीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या निवडीबाबत त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत भाजपचे नगरसेवक राजन घोरपडे यांना विचारले असता तुषार आपटे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच ते एका नामांकीत शिक्षण संस्थेवर पदाधिकारी आहेत. त्या प्रकरणात ते आरोपी असले तरी त्यांच्यावर दोष सिद्ध झाला नाही. तसेच मुख्य आरोपीला शिक्षा मिळाली आहे. त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महत्वाचे काम केले. त्यामुळे पक्षाचे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिल्याचे घोरपडे यांनी सांगितले आहे.
