ठाणे : अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. रामरक्षा म्हणायला हरकत नाही, परंतु आता खूप उशीर झालेला आहे. रामरक्षा म्हणण्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका केली असून त्यावर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे व ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवत करत भाजपला टोला लगावला आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीच्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका करणारी पोस्ट केली होती. उद्धवजींनी रामरक्षा म्हणायला हरकत नाही, परंतु आता खूप उशीर झालेला आहे. खुंटीला टांगून ठेवलेल्या हिंदुत्वावर बरीच धूळ आणि जळमटे चढली आहेत, अशी टीका भातखळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या हिंदुत्वाची काळजी करण्यापेक्षा अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या तुमच्या चोरांना आधी आवरा. ज्यांच्या छत्रछायेखाली देवाच्या दारात चोऱ्या होतात, त्यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेवर आणि उद्धव साहेबांच्या हिंदुत्वावर बोलू नये, असे दिघे यांनी म्हटले आहे. या पोस्टनंतर राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीचा मुद्दा आणि हिंदुत्वाच्या राजकारणावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा शाब्दिक संघर्ष रंगला असून, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
