उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या प्रक्रियेत शिवसेनेने केलेल्या खेळीनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे. या वाढत्या संघर्षामुळे उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना महायुती अधिकृतपणे तुटल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. उल्हासनगर पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय भाजपने घेतला असून, कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आगामी निवडणुकीत कोणतेही काम न करण्याचा आक्रमक निर्णयही भाजपच्या सर्व ३७ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच युतीतील बेबनाव उघड झाला आहे.

भाजप आणि शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या या संघर्षाचे मूळ उल्हासनगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडणुकीत आहे. या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत भाजपला चार जागा मिळण्याची अपेक्षा असताना, शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांनी केवळ दोनच भाजप नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपला दोन जागांवर पाणी सोडावे लागले, तर वाट्याला तीन जागा असतानाही शिवसेनेने आपले ५ स्वीकृत नगरसेवक निवडून आणले. शिवसेनेच्या या विश्वासघातामुळे आणि सातत्याने होणाऱ्या गळचेपीमुळे भाजपमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, सर्व ३७ नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत उल्हासनगर पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच, आम्हाला ज्या पद्धतीने जखम देण्यात आली आहे, त्यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम कुणी करेल का, असा सवाल उपस्थित करत, सर्व नगरसेवकांनी हात वर करून नाही करणार, नाही करणार अशा घोषणा देत खासदार शिंदे यांच्यावर प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पालिकेतील गटनेते राजेश वधारिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना युती तोडण्याची आणि सत्तेतून बाहेर पडण्याची ही घोषणा केली. या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला स्थानिक आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिकांच्या पाठिशी श्रीकांत शिंदेच

उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांनी स्विकृत निवडणुकीत सभागृह नेते अरूण आशान यांनी दिलेला संदेश वाचून दाखवला. त्यानुसार आयुक्तांनी मंजुर केलेल्या आमच्या दोन नव्या उमेदवारांची नावे वगळण्यात आली. त्याजागी शिवसेनेच्या नावांचे वाचन होऊन घोषणा करण्यात आली. अरूण आशान कुणाच्या आशिर्दावाने हा निर्णय घेतील हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेनेच्या पाठिशी खासदार श्रीकांत शिंदेंच असावेत, असा दावाही यावेळी राजेश वधारिया यांनी केला.

कल्याण लोकसभेत भाजपची ताकद

कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मुळ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ येतो. त्यासह या लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी डोंबिवली, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. तर अंबरनाथ, कल्याण ग्रामीण या दोनच ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. जवळपास सर्व महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांची समसमान नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेतही भाजपची ताकद मोठी आहे. भाजपच्या या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला आणि पर्यायाने खासदार श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो.

राज्यात महायुतीत पडसाद उमटण्याची शक्यता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्याने, उल्हासनगर भाजपच्या या भूमिकेमुळे राज्यातील महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी आणि हा निर्णय त्यांच्या कानावर घातला आहे. उल्हासनगरमधील या राजकीय घडामोडींचे तीव्र पडसाद आता राज्यभरातील महायुतीच्या स्थानिक समीकरणांवर उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वरिष्ठांना आमचा निर्णय कळवला आहे. त्यावर त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल, असेही राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले आहे.