ठाणे : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला असून यामुळे ठाणे शहरात भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी बँन्जो, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत पेढे आनंद व्यक्त केला. तसेच वाढत्या उन्हामुळे नागरिकांना यावेळी कोकम सरबतचेही वाटप करण्यात आले.

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवित सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव सुरू झाला असून अशाचप्रकारे भाजप ठाणे शहराच्या वतीने वर्तक नगर येथील विभागीय कार्यालयात सकाळी ११.३० वाजता पहिला कार्यक्रम पार पडला. जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश लेले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोर दुपारी १२.३० वाजता दुसरा विजयोत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नगरसेवक संजय संतु वाघुले यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात प्रवासी आणि नागरिकांनाही पेढे भरविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून भर उन्हातच हा जल्लोष साजरा करण्यात आला. यामुळे यावेळी उपस्थितांना कोकम सरबत वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या निवडणुकातील यशामुळे पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेने विश्वास दाखवला असून आगामी काळातही विकासकामांवर भर दिला जाईल, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत होत्या. या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमुळे ठाण्यात भाजपचा उत्साह पाहायला मिळाला. या विजयोत्सवात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.