कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेचे सभागृह ही आमची जहागिरी आहे. तेथे आम्ही कोणाविषयी काहीही बोलू शकतो. अशी अनेक नगरसेवकांची विचारधारा बनली आहे. या नगरसेवकांचे सभागृह संकेतांचे कोणतेही प्रशिक्षण, मार्गदर्शन त्यांना न झाल्याने हे नगरसेवक पालिका सभागृहात अनेक वेळा बेछुट, सभागृह संकेत तोडून भाषणे करतात. गेल्या महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेत भाजपच्या एका नगरसेवकाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ‘ब्लॅकमेलर’ शब्द वापरून हे कार्यकर्ते पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतात, असे भाष्य केले.

यासर्व प्रकरणात कल्याण डोंबिवली पालिकेत सक्रिय असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीवर भाजपच्या डोंबिवलीतील एका नगरसेवकाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कल्याण डोंबिवली पालिकेतील अनेक प्रकरणे धसास लावणारे कल्याणमधील ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी संबंधित भाजप नगरसेवकाला ज्येष्ठ वकील नितीन खंडाळकर यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस बजावून येत्या ३० दिवस आपण केलेले आरोप सबळ पुराव्यानिशी सिध्द आणि स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची बदनामी केली म्हणून फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ताटे सक्रिय

या नोटिसीसाठी आपणास १० हजार रूपये खर्च आला आहे. तो खर्चाचा बोजाही संबंधित नगरसेवकावर टाकण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत १० ते १५ माहिती अधिकार कार्यकर्ते पालिका प्रशासनातील विविध प्रकारची प्रकरणे बाहेर काढून धसास लावण्याचा, याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामध्ये ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे हेही अशी प्रकरणे बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन, कठोर शिक्षा होतील यासाठी प्रयत्नशील असतात.

माहिती कार्यकर्ते ब्लॅकमेलर

पालिकेतील विविध नागरी प्रश्न आणि नगररचना विभागातील विषयावर मार्चमधील महासभेत चर्चा सुरू होती. यावेळी भाजपचा डोंबिवलीतील एक अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विषयावर बोलताना हे कार्यकर्ते ब्लॅकमेलर आहेत. हा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा ग्रुप पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतो, असे म्हटले. यामुळे माहिती कार्यकर्त्यांची बदनामी केली म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्याने कल्याण डोंबिवली पालिकेतील कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कधी, कोणत्या वेळी ब्लॅकमेल केले आहे. याची माहिती पुराव्यानिशी द्यावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा कोणता ग्रुप आहे. त्या ग्रुपमधील सदस्यांची नावे ओळख पुराव्यानिशी नाव जाहीर करावी. पालिका नगररचना विभागातील कोणत्या अधिकाऱ्यासमोर कोणते माहिती अधिकारी कार्यकर्ते सतत बसलेले असतात. त्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी.

माहिती अधिकार कार्यकर्त्याने ब्लॅकमेल केले म्हणून संबंधित नगरचना किंवा इतर अधिकारी, कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठाकडे तक्रार केली आहे का. त्याची प्रत आपणाकडे आहे का, ती सादर करावी. आपल्या वक्तव्याने सनदशीरमार्गाने माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे आपण येत्या ३० दिवसाच्या अवधीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल संबोधल्याने आपल्याकडील सबळ पुराव्यानिशी आपण मला उत्तर द्यावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, अशी नोटीस माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी ॲड. खंडाळकर यांच्यातर्फे भाजपच्या डोंबिवलीतील एका नगरसेवकाला पाठवली आहे. या नोटिशीने पालिकेत खळबळ उडाली आहे. तसेच, पालिका महासभेत पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा अन्यांविषयी बेलगाम आश्चर्यकारक वक्तव्य करणाऱ्या नगरसेवकांना चाप लागणार आहे.