डोंबिवली : कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालया समोरील ठिय्या आंदोलनाच्यावेळी काँग्रेसचे डोंबिवलीतील उपाध्यक्ष मामा उर्फ प्रकाश पगारे यांनी शनिवारी व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आक्षेपार्ह विधान केले. या विधानाविषयी आणि मामा पगारे यांच्या विषयी भाजप डोंबिवली पदाधिकारी आणि संघाच्या ज्येष्ठांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि मामा पगारे यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली.
‘स्वातंत्र्याच्या काळात दोनच प्रकारची माणसे होती. एक पुरूषार्थ सारखी होती ती तुरूंगात गेली आणि जे नामर्द होते ते संघात गेले,’ अशी विखारी टीका डोंंबिवलीतील काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांनी ठिय्या आंदोलनाच्यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समोर केली. उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विधानाला जोरदार प्रतिसाद दिला. मामा पगारे यांच्या भाषणाची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली. ही चित्रफिती पाहून भाजप, संघाच्या स्वयंसेवक, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
भाजपचे डोंबिवलीतील पदाधिकारी आणि भोपरचे रहिवासी संदीप माळी यांनी माध्यमांना सांगितले, पंतप्र्धान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. देश, राज्य विकासाची कामे करून हे दोन्ही नेते देश, राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा नेत्यांच्या मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बोलण्याचा काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांना कोणताही अधिकार नाही. संघ ही राष्ट्र, धर्म आणि सामाजिक भावनेने काम करणारी संस्था आहे. या संघाविषयी रडक्या स्वभावाच्या मामा पगारे यांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही, असे माळी यांनी सांगितले.
मामा पगारे यांच्यावर भाजपने गुन्हा दाखल केल्यापासून ते सतत पोलीस उपायुक्त कार्यालयात जाऊन रडत बसत आहेत. अशा रडक्या स्वभावाचे मामा पगारे हे नाटकी कलाकार आहेत. त्यांनी आपल्या कार्याला शंंभर वर्ष पूर्ण केली अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आक्षेपार्ह विधान करून संघाची, संघ स्वयंसेवक आणि या संघ शिस्तीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्तांनी मामा पगारे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी संदीप माळी यांनी केली आहे.
काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि आपणास गुंड, गुन्हेगार असे शब्द वापरत आहेत. पण गेल्या चार वर्षापासून आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही. यापूर्वीचे गुन्हे न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे आम्हा विषयी अवमानकारक शब्द वापरण्यात आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे माळी यांनी सांगितले. मामा पगारे यांच्या संघाविषयीच्या आक्षेपार्ह विधानावरून डोंबिवलीत पुन्हा भाजप विरूध्द काँँग्रेस असा वाद उफळण्याची शक्यता आहे.
