ठाणे : ठाणे महापालिका निवडणुक युतीत लढविणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने महापौर, उपमहापौर पदाचे अर्ज दाखल केले. निवडणुक झाल्यावर किमान दोन वर्षे महापौर पद द्या अशी मागणी करत भाजपने दबाबतंत्र सुरू केले होते. शिंदेच्या शिवसेनेने दबाब झुगारत उपमहापौर पदावर भाजपची बोळवण केली. भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला पण, त्यांनी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेतील राजकीय गणिते मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावला. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के हे उपस्थित असतानाही भाजपचे आमदार संजय केळकर हे उपस्थित नव्हते. यातूनच केळकर यांच्यासह भाजपतील एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी ६६ नगरसेवक इतके संख्याबळ आवश्यक आहे. शिंदेच्या सेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून अपक्ष नगरसेवकाने शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदेच्या सेनेतील नगरसेवकांचे संख्याबळ ७६ इतके झाल्याने त्यांच्याच पक्षाचा महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु निवडणुक युतीत लढली असल्यामुळे किमान दोन वर्षे महापौर पद देण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मांडली होती. शिंदे सेनेने महापौर पद देण्यास नकार देत उपमहापौर पदावर भाजपची बोळवण केली आहे.
पाच वर्षातील पहिले आणि शेवटचे सव्वा वर्षे उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या पाच वर्षे देण्याची तयारी शिंदे सेनेने दाखविली होती. भाजप नेत्यांनी त्याहून अधिकची पदे देण्याची मागणी केली होती. पाच वर्षातील पहिले आणि शेवटचे सव्वा वर्षे उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या पाच वर्षे देण्यासह भाजपनेही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पद एक-एक वर्ष देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु शिंदे सेनेने स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पद देण्याची अद्याप तयारी दाखविलेली नाही. तुर्तास भाजपला केवळ उपमहापौर पद देऊ केल्याने भाजपमधील एक मोठा गट नाराज आहे. सत्तेतील सहभागात अपेक्षित पदे मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची आग्रह भाजपच्या नाराज नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे धरला. परंतु या नेत्यांनी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेतील राजकीय गणिते मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावला.
जकात घोटाळ्यातील आरोपीची पत्नी महापौर
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१२ मध्ये दहा जकात (ऑक्ट्रॉय) दलालांना अटक करून कोट्यवधी रुपयांचा जकात चोरीचा घोटाळा उघडकीस आणला होता. यामध्ये शिंदेच्या शिवसेनेने ठाणे महापालिका महापौर पदाची उमेदवारी दिलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांचे पती रोहित गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबई महापालिकेने केलेल्या तक्रारींच्या आधारे याप्रकरणाचा तपास करण्यात आला होता. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मालावर जकात कर भरावा लागत होता. वाहतूकदाराला मुंबईत प्रवेश मिळण्यासाठी जकात भरल्याच्या पावत्या दाखवाव्या लागत होते. दलाल बनावट जकात पावत्या आणि बनावट बँक पावत्यांचा वापर करून उत्पादकांकडून घेतलेली संपूर्ण जकात रक्कम स्वतःकडेच ठेवत होते. मुंबई महापालिकेला जकातीमधून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळायचे, पण, जकात चोरीमुळे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असल्याचा दावा करण्यात आला होता.
सत्ता सहभागाबाबत पक्षात वेगवेगळी मते होती. परंतु पक्ष नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या दिवशी उपस्थित राहणार आहे. -संजय केळकर, भाजप आमदार

