कलंकित नेत्यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या भाजपने शनिवारी पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांना थेट पक्षात घेण्याऐवजी त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा पर्याय निवडला. रिपाइं, ओमी आणि भाजप या तिघांची उल्हासनगर विकास आघाडीची अधिकृत घोषणा भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ओमी यांचा जणू भाजपमध्ये प्रवेश होत आहे, अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांनी मात्र स्वत:ला या प्रक्रियेपासून दूर ठेवले असले तरी त्यांचाही छुपा पाठिंबा ओमी यांच्या भाजप आघाडीस असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमधील राजकारण वेगळ्याच टप्प्यावर गेले होते. टीम ओमी कलानीच्या भाजप प्रवेशाने पक्षाला महापालिका निवडणुकीत बळ मिळणार असल्याचे सांगत ओमीच्या प्रवेशासाठी भाजपमधील एका गटाने कंबर कसली होती. मात्र प्रवेशाच्या दोन दिवसांपूर्वी आपला निर्णय बदलत ओमी कलानी यांनी भाजप आणि रिपब्लिकन पक्षासोबत नवी आघाडी स्थापण्याचा निर्णय घेतला. उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात एका भव्य कार्यक्रमात ओमी कलानी, रिपाइं आणि भाजप अशा नव्या ‘उल्हासनगर विकास आघाडी’ची घोषणा करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या ओमी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकारण ढवळून निघाले असताना त्यांनी अचानकपणे स्थापन केलेल्या उल्हासनगर विकास आघाडीमुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ओमी कलानीच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या कुमार आयलानी गटाने केलेल्या राजकीय खेळीमुळे त्यांचा भाजप प्रवेश टळला गेल्याचे बोलले जाते.

ज्योती कलानी यांच्या राजीनाम्याची चर्चा..

ओमी कलानी आणि सहकाऱ्यांनी भाजप, रिपाइंसोबत आघाडी जाहीर केल्यानंतर ज्योती कलानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची चर्चा दिवसभर शहरात होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सांगत राजीनाम्याचे वृत्त राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी फेटाळले.