ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरात विविध प्रकल्पांचे उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु या लोकार्पण कार्यक्रमापूर्वीच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपास सुरूवात झाली आहे. दिवा शहरात २२१ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली जलवाहिनी लोकार्पणापूर्वीच फुटल्याचा दावा भाजपच्या दिवा येथील पदाधिकारी करत आहेत. विशेष म्हणजे, दिवा शहर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील आहे. असे असतानाही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या दिव्यात विस्तव जात नसल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच दिवा शहाराच्या दौऱ्यावर येणार असून यानिमित्ताने शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. दिवा शहरात शिंदे समर्थकांनी फलकबाजी सुरू केली असून या फलकावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र गायब झाले आहे. त्यामुळे राज्यात सत्तेमध्ये असतानाही शिंदे गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. हेही वाचा >>>पदपथ अडवणाऱ्या कार विक्रेत्यावर कारवाई दहा फुटांचा पदपथ मोकळा, वाहनचालकांना दिलासा दिवा शहरात यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक निवडुण आले होते. यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे दिवा परिसराचे नेतृत्व करीत असून ते शिवसेनेचे येथील शहर प्रमुख आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातही हा परिसर येतो. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या भागावर शिवसेनेने गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रीत करून याठिकाणी राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिव्यात पाणी प्रश्न मोठ्याप्रमाणात भेडसावतो. त्यामुळे पाणी प्रकल्प योजनेतंर्गत नवीन मुख्य जलवाहिनीचेही लोकार्पण केले जाणार आहे. हेही वाचा >>> डोंबिवलीत ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारतींना नोटिसा, संरचनात्मक परीक्षण करुन घेण्याचे आदेश परंतु भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी एक चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करून २२१ कोटी रुपयांच्या ज्या जलवाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. ती जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये विस्तव जात नसल्याचे समोर येत आहे. तसेच शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी मुंडे यांनी रमाकांत मढवी यांच्याविरोधात थेट आरोप केले आहेत. भाजपचे रोहिदास मुंंडे यांनी शिंदे यांच्या गटातील माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांच्याविरोधात पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला आहे. दिव्यातील अनधिकृत बांधकामांना विरोध करत असल्याने रमाकांत मढवी, महापालिकेचे साहाय्यक आयुक्त आणि अनधिकृत बांधकाम करणारे माफिया यांच्या जीवापासून मला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.