”… राजकीय वरदहस्त आहेच”; दरेकरांची ठाण्यातील ‘त्या’ घटनेवर प्रतिक्रिया

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला.

pravin-Darekar
''काही फेरीवाले भाई झाले आहेत…''; दरेकरांची ठाण्यातील 'त्या' घटनेवर प्रतिक्रिया

ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंगळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोट ठेवलं.

“त्या हाताश झाल्या आहेत. एक महिला अधिकारी अशाप्रकारे अनधिकृत गोष्टी मोडून काढण्यासाठी धाडसाने जाते. फेरीवाल्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती जीवघेणा हल्ला करतात, हे दुर्दैवी आहे. कल्पिता पिंगळे यांच्यात मला आत्मविश्वास दिसला. त्यांच्या बोटांवर शस्त्रक्रिया देखील झाली आहे. आता दोन दिवसात बोटं व्यवस्थित जुळतात की नाही पाहावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. तिथे राजकीय वरदहस्त आहेच. फेरीवाल्यांच्या या निमित्ताने शोध घेणं आवश्यक आहे. गरीब जे फेरीवाले आहेत ते इमानदारीत काम करतात. पोटाची गुजराण करण्यासाठी काम करतात. काही फेरीवाले दादा झाले आहेत. त्यांचा एरिया, त्या भागात फूटपाथवर फेरीवाल्यांना धंदा लावयला द्यायचं. त्यांच्याकडून हफ्ते जमा करायचे. हफ्ते काही राजकीय पुढाऱ्यांना, काही संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचे. ही एक साखळी आहे.” असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

“बरं झाल्यानंतर कारवाई पुन्हा सुरु करणार”; ठाण्यात हल्ल्यात जखमी झालेल्या सहायक आयुक्तांचा इशारा

“देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना फेरीवालं धोरण त्या ठिकाणी आणलं होतं. अजून त्या धोरणाला अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं नाही. एक सुस्पष्ट फेरीवाला धोरण आणलं पाहीजे, अशी मागणी आहे. दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्कासारखी कारवाई करण्याचं नियम ठेवला तर धाक राहील.”, असं देखील त्यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader pravin darekar on thane feriwala rmt