ठाणे : मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहर युनूस शेख या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे चार नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी ” कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले. त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. असे असतानाचा आता भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी या वक्तव्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा नेते किरीट सोमय्या ही उपस्थित होते. निरंजन डावखरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची चांगली पकड आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. याच समर्थांपैकी एक असलेले युनूस शेख आणि सहर शेख या युनूस यांच्या कन्या. मात्र युनूस यांच्या म्हणण्यानुसार आव्हाड यांनी आपल्याला पालिका निवडणुकीत तिकीट नाकारले. हाच रोष मनात ठेऊन त्यांनी आपल्या चार समर्थकांना ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मध्ये एआयएमआयएम कडून उमेदवारी मिळवून देत निवडून देखील आणले. यामध्ये नफिस अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरिक या चार उमेदवारांचा विजय झाला. या निकालाममुळे मुंब्रामधील राजकीय समिकरणे बदलल्याचे चित्र आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय वर्चस्वाला हा धक्का ही मानला जात आहे. तर या विजयानंतर सहर युनूस शेख यांनी भाषण करत आव्हाड यांना डिवचले.
आपल्या भाषणात सहर शेख म्हणाल्या, आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही, असा टोलाही आव्हाड यांना शेख यांनी लगावला. तर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे विधानही त्यांनी केले. दरम्यान, सहर शेख यांच्या भाषणतील ‘पूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू’, या विधानावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सहर शेख यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. “हिरवा हा आमच्या पक्षाचा रंग आहे. रंग कोणत्याही धर्माशी जोडलेले नाहीत. संविधान कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा रंग आहे असं सांगत नाही. माझं वक्तव्य धर्मांध नव्हतं. माझा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे, असे स्पष्टीकरण सहर शेख यांनी दिले.
मात्र या वक्तव्यावरून निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापालिका निवडणुकीनंतर एआयएमआयएमचे काही नेते मुंब्रामध्ये प्रक्षोभक, हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी अशा वक्तव्यांना कठोरपणे आव्हान देणे व योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा नेते किरीट सोमैय्या, भाजपच्या पदाधिकारी अनुसया भगत, मुंब्रा मंडल अध्यक्ष सुजित गुप्ता, मुंब्रा-कौसा मंडल अध्यक्षा नाझिया तांबोळी, मुंब्रा मंडल सल्लागार अनिल भगत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे आता मुंब्रा पोलीस यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
