ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट एकीकडे शिवसेना पक्षावर सातत्याने दावा सांगत असताना भाजपचे डोंबिवलीतील आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत कमळ उगवेल असा दावा केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघात नागरिकांच्या आवडीचा आणि विरोधी पक्षाच्या मनातला उमेदवार देईल, असा दावा केला. त्यामुळे शिवसेनेवर दावा सांगणारे मुख्यमंत्री पुत्र या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार का याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही सख्य असून सुरत, गुवाहाटी मोहिमेत त्यांची सक्रिय भूमिका राहिली होती.

 नेमके काय म्हणाले चव्हाण ?

 येत्या दोन वर्षांत देशाच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री भेटी देणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या  नियोजन संदर्भात कळवा येथील सिद्धी सभागृहात  भाजप नेत्यांची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांनंतर कमळ उगवलेले दिसेल असा दावा केला. कल्याण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद खूप मोठी आहे. या मतदारसंघात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला भाजपशी युती करण्याशिवाय पर्याय नाही असे देखील ते म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे हे भाजप – शिवसेना युतीत निवडून आले आहेत.

विकासकामे वेगाने- बावनकुळे

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येत्या कालावधीत इतक्या मोठय़ा प्रमाणात विकासकामे करील की विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.  मागच्या सरकारने कोणतेही विषय मार्गी लावले नाहीत. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ravindra chavan claim kalyan lok sabha constituency for upcoming elections zws
First published on: 07-08-2022 at 03:59 IST