scorecardresearch

डोंबिवलीत भाजप-शिवसेनेत रणिशग; रवींद्र चव्हाण यांच्या एकनाथ शिंदे विरोधी फलकावरून शाब्दिक युद्ध

समाजमाध्यमांवरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना उत्तर-प्रत्युत्तरे देत आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

रवींद्र चव्हाण यांच्या एकनाथ शिंदे विरोधी फलकावरून शाब्दिक युद्ध

डोंबिवली : भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी  बुधवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डोंबिवली विकासाचे मारेकरी असा आरोप केले. तशा आशयाचे फलक डोंबिवलीच्या विविध भागात लावल्याने विकास कामांच्या निधीच्या मुद्दय़ावरून हे दोन पक्ष पुन्हा हमरीतुमरीवर आले आहेत. आमदार चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत जाऊन भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केले.

समाजमाध्यमांवरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना उत्तर-प्रत्युत्तरे देत आहेत. पाच वर्षांपूर्वी राज्यमंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहरासाठी ४७१ कोटीचे ३० रस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतले होते. त्यानंतर राज्यातील सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तत्कालीन सरकारने एमएमआरडीएच्या मार्फत मंजूर केलेला निधी मोकळा करा, अशी मागणी चव्हाण नगरविकास विभाग, एमएमआरडीएकडे करत होते.

दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीवरून कल्याण, डोंबिवली शहरांसाठी ३७२ कोटीचे रस्ते सहा महिन्यापूर्वी मंजूर केले. खासदारांनी केलेली मागणी तात्काळ मान्य होऊन त्यांना निधीही मिळतो. मी सातत्याने डोंबिवलीचा निधी मागतो तर तो मात्र मोकळा केला जात नाही, यावरून आमदार चव्हाण सातत्याने शासनाकडे नाराजी व्यक्त करत होते. दरम्यानच्या काळात माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीत आमदार चव्हाण यांनी मंजूर करून घेतलेली ४७१ कोटीची ३० रस्ते कामे रद्द करण्यात आली आहेत, असे उत्तर एमएमआरडीएने दिले.

शिवसेनेचा आरोप

मागील वीस वर्षांत मनापासून आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहराचा विकास केला असता तर त्यांना मुंबईला जाऊन पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. त्यांच्या सोबत भाजपचा एकही अभ्यासू, मोठा नेता नव्हता. यावरून त्या पत्रकार परिषदेची उंची लक्षात येते. कोकणात जायचे असले की आमदार चव्हाण अशी पत्रकार परिषद घेऊन राळ उडवतात आणि चर्चेत राहतात. ती राळ संपली की पुन्हा माघारी येऊन असेच काही तरी बडबड करतात, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla ravindra chavan journalist from bjp state office urban development minister eknath shinde akp

ताज्या बातम्या