डोंबिवली परिसरातील २७ गावांमधील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसी या शासकीय यंत्रणा या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नसल्याने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी मनसे, भाजपाने सोमवारी येथील पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले होते. आयु्क्त, अधिकाऱ्यांच्या नावे टाळया, भांडी वाजवून निषेध केला जात होता. मोर्चाला सामोरे जाण्यासाठी आयुक्त उपलब्ध नसल्याने दोन्ही आमदारांनी समपदस्थ अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

येत्या काही दिवसात डोंबिवली २७ गाव परिसरातील पाणी प्रश्न निकाली निघाला नाहीतर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसून देणार नाही, असा इशारा भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला. लोकांच्या पाणी प्रश्नावरून अधिकारी पोरखेळ खेळत असतील. हा विषय गांभीर्याने घेत नसतील तर आमदारकी खड्ड्यात गेली तरी चालेल, अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पालिका मुख्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी दिला.

पालिकेत येतो त्यावेळी आयुक्त उपस्थित नसतात. आम्ही दाढी लावून येऊ तेव्हा आयुक्त उपस्थित राहणार का, असा तिरकस प्रश्न आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला. काही महिन्यांपासून २७ गावांमधील नांदिवली, भोपर, मानपाडा, पिसवली, देसलेपाडा परिसरात भीषण पाणी टंचाई आहे. टँकर आल्याशिवाय रहिवाशांना पाणी मिळत नाही. २०० हून अधिक टँकरचा पाणी पुरवठा गावात केला जातो. म्हणजे गावे दुष्कळी जाहीर केली पाहिजेत. दररोज टँकरला पैसे मोजणे अनेकांना शक्य होत नाही. अशा दुहेरी कोंडीत रहिवासी अडकले आहेत. २७ गावांना पाणी पुरवठा करणे हे एमआयडीसी आणि पालिकेचे संयुक्त काम आहे. या दोन्ही यंत्रणा जबाबदारी झटकत असल्याने पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसेने सोमवारी पालिकेवर मोर्चाचे आयोजन केले होते. हा लोकांचा प्रश्न असल्याने स्वतंत्र मोर्चा काढण्याऐवजी एकत्र मोर्चा काढू असा समझोता भाजपा-मनसेत झाल्याने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते. एमआयडीसी अधिकारी बैठकीला हजर नव्हते.

आमदारांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रमोद मोरे, राजीव पाठक, किरण वाघमारे यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदार पाटील, चव्हाण भडकले. कोणीतरी शाखाप्रमुख चुकीची माहिती देतो. त्याच्या सांगण्यावरून तुम्ही गावांचे पाणी नियोजन करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. एमआयडीसी किती पाणी गावांना देते. तेथे पाणी मोजणी मीटर लावा. पुरेसे पाणी येत नसेल तर त्याची नोंद ठेवा, अशी सूचना आमदार चव्हाण यांनी केली. एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवर मीटर लावण्यासाठी परवानग्या कोणाच्या आणि कशासाठी, असे आमदार चव्हाण यांनी बजावले. बैठकीत दोन्ही आमदार संतप्त झाल्याने काही वेळ वातावरण तापले होते.

युतीची नांदी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेपासून मनसे, भाजपा युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा, मनसेने कल्याणमध्ये एकत्र मोर्चा काढल्याने ही आगामी पालिका निवडणुकीतील युतीची नांदी नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेची टीका

हे स्वार्थी प्रेम प्रकरण १३ वर्ष गुपचूप सुरू होते. आज ते खुले झाले, अशी टीका डोंबिवलीतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे-भाजप मोर्चावर केली आहे.