शहरबात : गुन्हेगार आवडे सर्वानाच!

उल्हासनरातून कलानी राज संपविणारे भाजप नेतेच अच्छे दिनांसाठी पप्पूला आवतण देऊ लागले आहेत.

सागर नरेकर

हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरल्याने जन्मठेपेची शिक्षा भोगणारा पप्पू कलानी पॅरोल सुटीवर उल्हासनगरात आहे. या काळात तो सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. त्याचे स्वागत होते आहे आणि त्याला पुन्हा शहराची धुरा द्यावी, त्याच्याशिवाय शहराला पर्यायच नाही अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. नागरिकांना नक्की हवे तरी काय, असाच सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पप्पूविरोधात एकेकाळी रणिशग फुकणारे आणि काही काळ उल्हासनरातून कलानी राज संपविणारे भाजप नेतेच अच्छे दिनांसाठी पप्पूला आवतण देऊ लागले आहेत.

नव्वदीच्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याची ओरड होत होती. तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गुन्हेगारांवर बोट ठेवत आरोपांची राळ उडवली होती. त्यात उल्हासनगर शहरातील कुख्यात गुंड पप्पू कलानी याचेही नाव होते. विविध प्रकारचे गुन्हे त्यावेळी पप्पू कलानीवर होते. पुढे एका हत्येप्रकरणी दोषी ठरल्याने पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. उल्हासनगर शहरातील कलानी पर्वाचा अस्त होईल अशी शक्यता असतानाच पप्पू कलानी यांची पत्नी दिवंगत ज्योती कलानी यांनी शहरात पुन्हा कलानी वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी कंबर कसली. विधानसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकीत त्या आमदार म्हणून निवडूनही आल्या. तीन वर्षांनंतर झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानींचा करिष्मा दिसू लागताच आपल्या दिवंगत नेत्यांच्या विचारधारेला तिलांजली देत स्थानिक भाजपने कलानी कुटुंबाला जवळ केले. नैसर्गिक शिवसेना मित्रपक्षाला दूर करत कलानी गटाला सोबत घेऊन उल्हासनगर महापालिकेवर भाजपने आपला महापौर बसवला. निष्ठावंत कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र सव्वा वर्षांतच कलानी गटाने दबाव टाकत भाजपकडून महापौरपद पदरात पाडून घेतले. भाजपच्या राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विचाराला यापूर्वीच तिलांजली देण्यात आल्याने कलानी महापौरपदी बसणे भाजपासाठी नवे राहिले नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुंबईतील एका भाषणात ‘बरे झाले भाजपपासून दूर राहिलो. अन्यथा आता मोदींच्या रांगेत जो पप्पू कलानीचा फोटो आहे त्याच्या शेजारी माझाही फोटो लागला असता’, असे सांगत भाजपच्या गुन्हेगारीकरणावर टीका केली होती. मात्र अडीच वर्षांनंतर ज्या कलानींची सोबत नसल्याचा अभिमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळगला होता. तो स्वाभिमान गहाण ठेवत त्याच कलानी गटाला घेऊन स्थानिक शिवसेनेने २०१९ मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचा महापौर विराजमान केला.

 त्या त्या वेळी राजकीय फायदा घेण्यासाठी प्रत्येक पक्षाने सोयीस्करपणे राजकारणातील गुन्हेगारीकरणाला विरोध आणि छुपे समर्थन केले. राजकीय पक्षांच्या बाबतीत ही टीका सातत्याने केली जाते. मात्र नागरिकांनाही गुन्हेगारांचे राजकारण पसंतीस पडू लागल्याचे चित्र सध्या उल्हासनगर शहरात दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरात पप्पू कलानीचा वावर प्रकर्षांने दिसू लागला आहे. सुरुवातीला फक्त खासगी कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात येणारा पप्पू कलानी सध्या कायमस्वरूपी तुरुंगातून सुटल्याचा भास निर्माण करण्यात त्याचे समर्थक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच की काय, पप्पू कलानी यालाही शहराचे नेतृत्व करण्याचे दिवास्वप्न पडू लागले आहे. गणेशोत्सवात विविध मंडळांना भेट देणाऱ्या पप्पू कलानीने आता विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनांनाही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमांमध्ये विविध गटांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना पप्पू कलानी आता उपस्थितांना शहर विकासाची स्वप्ने दाखवू लागला आहे. मला साथ द्या, आपण शहराचा विकास करू, समस्या संपवू अशी आश्वासक संवाद पप्पू कलानी साधू लागला आहे. त्याच्या या उघड जनसंपर्क मोहिमेत विद्यमान भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानीही सामील झाल्याचे चित्र गेल्या दोन आठवडय़ांत पाहायला मिळाले होते. एका खासगी कार्यक्रमात आमदार कुमार आयलानी आणि पप्पू कलानी एकत्र साग्रसंगीत भोजनाचा आनंद घेताना दिसले. याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर शहरात चर्चाना उधाण आले. या चर्चा संपण्यापूर्वीच पप्पू कलानी याने थेट आमदार कुमार आयलानी यांचे कार्यालय गाठत आरोग्यविषयक एका समस्येवर बैठकीत सहभाग नोंदवला. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे पप्पू कलानी भेटीने सुखावलेल्या कुमार आयलानी यांनी थेट पप्पू कलानी याला भाजपात प्रवेशाचे निमंत्रणच दिले. त्यावरून पक्षांतर्गत विरोध होऊ लागल्यानंतर कुमार आयलानी यांनी यावर मौन बाळगले आहे. मात्र कलानी गट आणि कलानी समर्थकांच्या सोबतच पप्पू कलानीच्या भेटीने भाजप आमदारालाही स्फुरण चढल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यामुळे भाजपाची कमालीची कोंडी झाली आहे. मात्र भाजप आमदाराने पप्पू कलानीवर उधळलेली स्तुतिसुमने आणि दिलेल्या पक्षप्रवेशाच्या आमंत्रणावर भाजपचा सध्याच्या देशातील कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेनेही मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. एरवी कलानींच्या गुन्हेगारीवर बोलताना शब्द कमी पडत नव्हते अशी शिवसेनेची अवस्था होती. मात्र पप्पू कलानीच्या सार्वजनिक वावरावर, भाजप आमदाराने दिलेल्या पक्षप्रवेशावर चकार शब्दही न काढणाऱ्या स्थानिक शिवसेनेबाबतही आता आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. येत्या काही महिन्यात उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. भाजपला नमवण्यासाठी कलानी गटाला जवळ करणारी शिवसेना येत्या काळात कलानींसोबत निवडणूकही लढवल्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय, शिवसेनेने पप्पू कलानीच्या राजकीय प्रचार मोहिमेवर अद्याप बोलणे टाळले आहे. सिंधीबहुल नागरिकांचा पप्पू कलानीला यापूर्वीही पाठिंबा होताच. त्यात भाजप आमदारांनाही पप्पू कलानी मैत्रीचे भरते आले आहे. शिवसेनेनेही मौन बाळगल्याने राजकारणात गुन्हेगार आवडे सर्वाना असेच चित्र दिसते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp offer murder convict pappu kalani to join party zws

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या