डोंबिवली : पुणे येथील एका महाविद्यालायतील राष्ट्रीय पुरुषांच्या ओळीतील शासन आदेशाप्रमाणे स्थापित केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढून टाकली. त्यांचे हे कृत्य निंदनीय आहे. त्यांची अशी कृती करण्याची पात्रता नसताना त्यांनी ती केली. त्यामुळे मनसेच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी शिंदे शिवसेनेने कल्याण-डोंबिवली पालिकेतील मनसे बरोबरची युती तोडावी, अशी मागणी कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्याकडे केली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुका भाजप, शिंदे शिवसेनेने युती म्हणून लढल्या. मोठे बहुमत या युतीमधून दोन्ही पक्षांनी मिळवून पालिकेत सत्ता स्थापन केली. ती होत असताना शिंदे शिवसेनेने आपले संख्याबळ वाढविण्यासाठी मनसेचे नगरसेवक आपल्याबरोबर घेऊन नवखा राजकीय घरोबा केला.
युती म्हणून पालिकेत एकत्र असताना या युतीमधील मनसेच्या अमित ठाकरे यांनी भाजपचे शीर्षस्थ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविद्यालयातील शासन निर्देशाप्रमाणे बसविलेली प्रतिमा काढून टाकण्याचा केलेला प्रयत्न खूप केविलवाणा व निषेधार्ह आहे. त्यांची पात्रता नसताना त्यांनी ही कृती केली आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या या कृतीचा भाजप निषेध करत आहे. त्याच बरोबर शिंदे शिवसेनेही याबाबत योग्य भूमिका घेत पालिकेत मनसेसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, असे आम्ही जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना सूचित केले आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
याबाबत शिंदे शिवसेनेने निर्णय घेतला नसला तरी त्याचा वरिष्ठ पातळीवर विचार करून मग भाजपचे शीर्षस्थ नेते योग्य निर्णय घेतली, असा इशारा जिल्हाध्यक्ष परब यांनी दिला आहे. ‘टिपू सुलतानाची प्रतिमा जेथे आहे, ती काढण्याची हिम्मत मनसेने दाखवावी. सत्तेसाठी इकडे लाडू खायाचे व तिकडे सत्तेच्या विरोधात आकांडतांडव करायचे. मनसेने ही दुटप्पी भूमिका सोडून द्यावी. पंतप्रधानांच्या बाबतीत केलेच्या कृत्याची शिक्षा घेत स्वत:हून पालिका सत्तेमधून बाहेर पडावे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
अंबरनाथचे काय?
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुणे येथील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा काढण्याच्या कृत्याचे शिंदे शिवसेनेने समर्थन केले नाही. त्यांची ती कृती चुकीचीच आहे. म्हणून या विषयावरून डोंबिवली भाजपने आम्हाला मनसे बरोबरची युती तोडण्यासाठी दिलेला इशारा मोठा एक विनोदाचाच भाग आहे. राहुल गांधी अनेक वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत, मग राहुल गांधींच्या टीकेकडे दुर्लक्ष करत अंबरनाथ पालिकेत भाजपने शिंदे शिवसेनेला बाजूला सारून काँग्रेसबरोबर सत्तेसाठी घरोबा केला. हे भाजपला चालते का. याठिकाणी भाजपचा युतीधर्म कुठे गेला, असा प्रश्न शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला.
कल्याण-डोंबिवली पालिकेत शिंदे शिवसेनेला सत्ता स्थापनेएवढे संख्याबळ सभागृहात होते. तरीही मोठे मन करून शिंदे शिवसेनेने भाजपला युतीधर्म पाळुन सत्तेमधील समान भाग दिला. मनसेला सोबत घेतले तरी शिवसेनेने आपल्या पदरात जागा करून त्यांना सहभागी केले. यात भाजपचे आम्ही काही कमी केले नाही. याऊलट शिंदे शिवसेनेला बाजूला सारून सत्ता स्थापनेसाठी भाजप कडोंमपात ठाकरे गटाबरोबर चर्चा करत होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला भाजपबरोबरचा युती धर्म कसा पाळायचे याची जी शिकवण दिली आहे, त्याचेच पालन करून आम्ही करत आहोत, असे सांगत उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी याऊलट भाजपने आपल्या अंतर्मनाला काही प्रश्न यानिमित्ताने विचारावेत, असा सवाल केला.
जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनीही पुणे येथे मनसेने केलेल्या कृतीचे आम्ही कधीच समर्थन केले नाही. भाजपकडून येणारे पत्र पाहून योग्य प्रत्युत्तर व प्रतिक्रिया दिली जाईल, असे सांगितले.
