ठाणे : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल हाती लागले असून अटीतटीच्या लढतीत भाजप-शिंदे महायुतीचे सरकार मुंबई महापालिकेत बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबई तोडणार अशा मुद्द्यांचा उल्लेख करत निवडणूक लढविली होती. आता मुंबईत ठाकरेंची सत्ता आली नसली तरी हिंदी वृत्तपत्रांमध्ये काय-काय छापून आले वाचूया..
मराठी भाषिक पट्ट्यात ठाकरे बंधूंना महापालिका निवडणुकीत स्विकारल्याचे दिसत असले तरी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाचे अधिक नगरसेवक निवडून आल्याने आता महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेवर असेल. महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर हिंदी वृत्तपत्रात नेमक्या काय -काय बातम्या आल्या याचा आढावा घेऊया.
– ‘हमारा महानगर’ या हिंदी वृत्तपत्रात मुंबईसह राज्यातील भाजपच्या कामगिरीविषयी लिहीण्यात आले आहे. या वृत्तपत्राच्या मथळ्यावर ‘ऐतिहासिक विजय के ‘चाणक्य’ फडणवीस’ असा उल्लेख आहे. तसेच ‘भाजप को ऐतिहासिक जीत दिलाने के चाणक्य महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ रहे, उन्होने अपने प्रतिद्वंद्वी उद्धव ठाकरे को अपनी चाणक्य नीतीसे हाशिये पर धकेल दिया’ असाही उल्लेख आहे.
– ‘एनबीटी’ या हिंदी वृत्तपत्रात ‘४१ साल के संघर्ष के बाद BMC में BJP सबसे बडी पार्टी’ असा मथळा दिला आहे. तर ‘ठाकरे परिवार की बादशाहत खत्म’ असाही उल्लेख आहे. या वृत्तात भाजपची मुंबईतील वाटचाल कशी होती याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
– ‘नवभारत’ वृत्तपत्रात राज्याच्या निकालाविषयी ‘देवेंद्र ही धुरंधर’ असा मथळा आहे. तर ‘ठाकरे बंधू बने करण-अर्जुन’-बच गई इज्जत’ असेही एक वृत्त आहे.
– ‘हिंदी सामना’ या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या मुखपत्रात ‘सत्ता के साम-दाम-दंड-भेद के बाद भी ब्रांड ठाकरे जिंदाबाद’ या मथळ्याखाली वृत्त आहे.
– ‘दै. भास्कर’ या वृत्तपत्रात राज्यातील भाजपच्या विजयाचा उल्लेख करत ‘धुरंधर भाजप’ असा उल्लेख आहे. ‘मुंबई समेत २३ में महायुती का कब्जा, ठाकरे का किला ढहा’ असे म्हटले आहे.
– ‘दै. जागरण’ या वृत्तपत्रात ‘ठाकरे ब्रँड काआखिरी किला भी ढहा, मुंबई में बनेगा भाजप मेअर’ अशा मथळ्याखाली वृत्त आहे.
