बदलापूरः विषय समित्यांच्या बैठकीला आमंत्रितांच्या नावाखाली सदस्य नसलेल्यांना आमंत्रित केले जाते आणि सदस्य असलेल्यांना बसायला जागा नसते, चुकीच्या पद्धतीने विषय पत्रिकेत विषय टाकले जातात असा आरोप करत शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषेद शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. नियोजन समितीच्या बैठकीवेळी हा प्रकार झाला.

मात्र शहर नियोजन विषयात आरोग्यासह बांधकामाचे विषय असताना निवडून आलेल्या सदस्यांना आमंत्रित केल्यास हरकत काय, आम्ही पारदर्शकपणे काम करतो. माध्यमांनाही बैठकीत आम्ही प्रवेश देत आहोत, असे सांगत नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नियोजन समितीची बैठक सुरू असताना त्यात गोंधळ झाला. शिवसेनेचे नगरसेवक रोहन पाटील, तुषार बेंबळकर आणि तुकाराम म्हात्रे यांनी सभेवर बहिष्कार घातला. आधीची सभा बेकायदेशीर होती. तरीही आम्ही सन्मान ठेवून बैठक सुरू ठेवली. ती सभा तहकूब करण्यात आली पण यात सदस्य सोडून भलतेच लोक बैठकीला आले. समितीचे सदस्य सोडून इतरांना बोलण्याचा अधिकार नसतानाही ते सदस्य बोलत होते. आम्ही सदस्य असूनही आम्हाला बसायला आणि बोलायला जागा नाही.

आम्ही बोलल्यानंतर आम्हाला पुढे बसण्याची संधी मिळाली, असा आरोप रोहन पाटील यांनी केला. त्यात समितीच्या अध्यक्षांनी पत्र देऊन सदस्यांना आमंत्रित केल्याची माहिती दिली. मात्र सदस्यांना संधी नाही आणि आमंत्रितांना बोलवले जात असेल तर याला काही अर्थ नाही, असाही आरोप पाटील यांनी यावेळी केली. याविरूद्ध आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी दिली.

या बैठकीत आरोग्य समितीचे सदस्य किरण भोईर आणि नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांच्यासह काही सदस्य उपस्थित होते. मात्र शहरात शहर नियोजनाची बैठकी सुरू होती. त्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण, पुनर्विकास आणि अनधिकृत बांधकाम कारवाईत पाडलेल्या बांधकामांमुळे होणारे प्रदुषण या आरोग्याच्या विषयांवरही चर्चा करणे आवश्यक होते. त्यामुळे सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आमंत्रित सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहेत आणि ते समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना बोलवण्यात काय हरकत, असा उलट सवाल समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला.

शहरात पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्या काळातील अनेक मुद्दे प्रलंबित राहिले आहेत. नियोजन करून काम केल्यास शहराला फायदा होईल. कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी इतर विषय समितीच्या सदस्यांना आमंत्रित करू नये असा कोणताही नियम नाही. उलट आम्ही माध्यमांनाही बैठकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे, जी आधी नव्हती, असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान, या गोंधळावरून कुळगाव बदलापूर नगर परिषदेची आगामी सर्वसाधारण सभा वादळी होणार असे दिसू लागले आहे. बदलापुरात सध्या सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विरोध पक्षातही अस्वस्थता पसरल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.