डोंबिवली – डोंबिवलीतील भाजपचे निष्ठावंत नगरसेवक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातील ५०० माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या कुटुंबीय, समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
माजी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या कल्याण डोंबिवली पालिका सेवेतील ३८ वर्षाच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा नक्कीच पक्षाला राजकीय कामाबरोबर सामाजिक, नागरिकांची प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी उपयोग होईल, असे खासदार डाॅ. शिंदे यांनी सांगितले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या पुढाकाराने मुंबरकर यांनी हा पक्ष प्रवेश केला.
भाजपला धक्का
डोंबिवली शहरावर भाजपचा वरचष्मा वाढविण्यासाठी स्थानिक नेते विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहेत. पक्षीय, सामाजिक संघटनाला विशेष महत्व देत आहेत. विविध पक्षातील इच्छुकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन संघटना मजबुत करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमधील ठाकुर्ली चोळे गावीतल निष्ठावंत माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी आणि त्यांचे समर्थक, डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर, दिनदयाळ रोड गणपती मंदिर प्रभागाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक, त्यांची कन्या ॲड. पूजा धात्रक आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पालिकेचे दोन दोन प्रभाग एकावेळी एका घरातून सांभाळणारी हे दोन्ही दाम्पत्ये शिंदे शिवसेनेत गेल्याने भाजपला हा धक्का मानला जात आहे.
पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळणाऱ्यावरून धुसफूस झाल्याने शैलेश धात्रक यांनी भाजपकडून उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्यांनी मग मनसेतून स्वता, पत्नी आणि मुलीसह निवडून लढविली होती. त्यात ते पराभूत झाले. ठाकु्र्ली चोळे प्रभागातून भाजपच्या प्रमिला चौधरी यांनी निवडणूक लढवली होती. मागील ३० वर्ष चौधरी दाम्पत्य आपला ठाकुर्ली चोळे प्रभाग सांभाळून होते. धात्रक दाम्पत्याचे विष्णुनगर, गणपती मंदिर प्रभागावर पूर्ण नियंत्रण होते.
ठाकरे गटाला खिंडार
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील युवा पदाधिकारी योगेंद्र भोईर, ट्विंकल भोईर, तसेच, कल्याण, अंबरनाथ ग्रामीण तालुक्यातील नारिवली परिसरातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख अशा २०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेते प्रवेश केला. जितू पेडणेकर, गायत्री पेडणेकर, मनीषा धुरी, ममता घाडिगावकर, शुभदा देसाई, प्रदीप जयस्वाल, शुभम मिश्रा, सागर सावंत, मनोज मुख्य, ऋतिक रणसुभे, घनश्याम सोनवणे, विकी निकम, प्रदीप खंदारे, हरी पाटील, काशिनाथ पाटील, वामन पाटील, प्रेमनाथ पाटील, राजेंद्र सावंत, प्रियांका कार्लेकर, महेश मांजरेकर यांचा पक्ष प्रवेशकर्त्यांमध्ये समावेश आहे.
कार्यकर्त्यांनी नागरिकांची नागरी समस्या आणि इतर कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे, दत्ता वझे, नगरसेवक अर्जुन पाटील उपस्थित होते.
