ठाणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवेनवे ‘प्रयोग’ करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यकारणीने जिल्हा स्तरांवर चक्क चिठ्ठया टाकून उमेदवारांची पसंती कळविण्याच्या आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा कार्यकारणीत असलेल्या पदाधिकारी, सदस्यांना आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांची नावे पसंतीक्रमानुसार बंद लिफाफ्यात पक्ष निरीक्षकाकडे सोपवावी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पराभवामुळे सतर्क झालेल्या भाजप नेत्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढविण्यावर सध्या भर दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांमधील संवाद वाढावा यासाठी देखील पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नागपूर, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी आणि बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मंगळवारी कोकण-ठाणे-पालघर पट्टयातील संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार आहे. शहा यांच्या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतही संवाद साधणार आहे. त्यामुळे कोकण पट्टीतील शहा यांचा हा दौरा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपुर्ण मानला जात आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर संवादाची भूमीका पक्षाच्या नेत्यांनी घेतली असताना दुसरीकडे वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांची निवड करतानाही स्थानिक कार्यकारणी, पदाधिकारी यांचे मत आजमावून घेण्याचा प्रयत्न आता पक्षाने सुरु केला आहे. ही प्रक्रिया बुधवारपासून राज्यभरात सुरु होत असून लिफाफे आणि चिठ्ठयांमधून उमेदवारांचा पसंतीक्रम मांडण्याची ही पद्धत काहीशी वादग्रस्तही ठरण्याची चिन्हे आहेत.

mla sada sarvankar effort to waive 26 rent of st space given to women self help group
आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
manju hooda bjp candidate haryana assembly election 2024
Haryana Assembly Election: वडील पोलीस अधिकारी, पती सराईत गुन्हेगार आणि निवडणुकीत सामना थेट माजी मुख्यमंत्र्यांशी; कोण आहेत मंजू हुड्डा?
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
displeasure atmosphere in bjp over cm eknath shinde given importance by party elites
शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये खदखद? मेट्रो-३ चा समारंभ ठाण्यात घेतल्याने नाराजी 
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

हेही वाचा >>>पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वावरून महायुती, महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ रंगात

चिठ्ठयांच्या खेळातून नवी स्पर्धा ?

राज्यभरातील वेगवेगळ्या मतदारसंघात राज्य भाजपकडून नेमण्यात आलेल्या निरीक्षकाकडून या बैठका घेण्यात येणार आहेत. ठाणे शहर आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडे सोपविण्यात आली असून ते बुधवारी सायंकाळी पक्षाच्या वर्तकनगर येथील मुख्यालयात बंद लिफाफ्यातून उमेदवारांचा पसंतीक्रम जाणून घेणार आहेत. त्यानुसार पक्षाचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा स्तरावरील प्रदेश निमंत्रीत सदस्य, खासदार, आमदार यांना या बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात आहे. या सदस्यांना एक बंद लिफाफा सोपविला जाणार आहे. या लिफाफ्यात तीन चिठ्ठयांवर पसंतीक्रमानुसार कोणत्या उमेदवाराची ठराविक मतदारसंघात निवड केली जावी याचे पर्याय उपस्थित सदस्यांकडून भरुन घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया व्यक्तीगत स्तरावर गोपनीय असावी अशी रचना करण्यात आली आहे. हे बंद लिफाफे निरीक्षकांकरवी पुढे राज्य कार्यकारणीकडे पाठविले जाणार आहेत.

हेही वाचा >>>रामटेकची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव

प्रक्रिया निर्दोष होण्याविषयी शंका ?

दरम्यान उमेदवार निवडीसाठी भाजप नेत्यांनी अनुसरलेली या नव्या कार्यपद्धतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीवर ठराविक नेत्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा वरचष्मा आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण घ्यायचे झाले तर याठिकाणी संदीप नाईक हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून येथील संपूर्ण कार्यकारणीवर त्यांचे वर्चस्व आहे. याठिकाणी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे आणि नाईक कुटुंबियांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. असाच प्रकार मीरा-भाईदर तसेच इतर काही मतदारसंघातही आहे. जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकारी आणि सदस्यांची ही ‘चिठ्ठी मते’ त्यामुळे एकांगी असू शकतात असा मतप्रवाह पक्षातील एका मोठया वर्गात आतापासूनच व्यक्त होत आहे. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही. ठाणे जिल्हा कार्यकारणीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मात्र बुधवारपासून अशापद्धतीने उमेदवार निवडीच्या पर्यायांवर बंद लिफाफ्यांद्वारे मते मागविण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असे सांगितले.