ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप हा तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला असला तरी, भाजपने ३८ जागा लढवून २८ नगरसेवक निवडून आणले आहेत. या निवडणुकीत भाजपाने कमी जागा लढवत तब्बल ७४ टक्के स्ट्राइक रेट ठेवला असल्याचे दिसून येते. या कामगिरीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांचे पक्ष वर्तुळात कौतुक होत आहे.

ठाणे महापालिका निवडणुक स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांनी मांडली होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांची पक्षाने नियुक्ती केली होती. जागावाटपात १३१ पैकी किमान ५० ते ५५ जागा मिळाव्यात असा केळकर यांनी कायम आग्रह धरला होता. मात्र अवघ्या ४० जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची समजूत त्यांनी काढली होती.

अशात आणखी दोन जागा कमी झाल्याने भाजपाने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. केळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घेत पक्षातील नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती. यात अनिता यादव, उषा वाघ, अनिता ठाकूर, माधुरी मेटांगे, वैभव कदम, सीताराम राणे, विकास पाटील यांचा समावेश होता. भाजपचे ३८ पैकी २८ उमेदवार निवडून आले. हा स्ट्राइक रेट ७४ टक्के होता. भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांनीही निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावल्याचे चित्र दिसून आले.

भाजप पक्ष वाढला

भाजपचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक हे वागळे इस्टेट, वर्तकनगर ते घोडबंदरपासून दिवा-शिळ या भागातील होते. त्यामुळे भाजप दुपटीने वाढल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. जागा जास्त मिळाल्या असत्या किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाला असता तर महापौरही भाजपचा झाला असता एवढे नगरसेवक निवडून आले असते, असा विश्वास कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत.

शहरात महायुतीचे ३१ उमेदवार निवडून आले

आमदार केळकर यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळानंतर त्यांनी विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक तीनवेळा जिंकली. शहरात विविध क्षेत्रात केलेल्या कामांबरोबरच आमदार आपल्या दारी आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या आणि गृहसंकुलांच्या अडचणी सोडवत शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. या उपक्रमांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याचा फायदा नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मतदार संघात महायुतीचे ३५ पैकी ३१ उमेदवार निवडून आले आहेत.