scorecardresearch

“शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधील फरक कळतो की नाही”, शिवसेनेच्या पोस्टरमुळे वाद; भाजपा संतापली, म्हणाले “हिंदुत्वाचा…”

जयंती शिवरायांची आणि फोटो संभाजी महाराजांचा; शिवसेनेकडून घोडचूक

BJP, Shivsena, Shivjayanti, Dombivli, Thane,
जयंती शिवरायांची आणि फोटो संभाजी महाराजांचा; शिवसेनेकडून घोडचूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवली शहराच्या विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे १५ फलक लावले आहेत. या फलकांवर शिवाजी महाराजांच्या जागी संभाजी महाराजांचा फोटो लावल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील फरक शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना कळतो की नाही, अशी टीका दिवसभर समाजमाध्यमं आणि डोंबिवलीतील रहिवाशांकडून केली जात होती.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने राज्याच्या कारभारात सामील झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडत असल्याची ही लक्षणे आहेत, अशी टीका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. या फलकावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे असल्याने किमान त्यांनी तरी फलक लावण्यापूर्वी फलकावरील कच्चा मजकूर नजरेखालून घालणे आवश्यक होते, असे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षापासून डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपामध्ये 471 कोटीची रस्ते कामे, इतर विकास कामांवरून कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांवर शाब्दिक हल्ले करण्याची एकही संधी सेना-भाजपाचे पदाधिकारी नेते सोडत नाहीत. गेल्या महिन्यात भाजपाचा कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रश्नावरून भाजपाने रान उठवले आहे. या हल्ल्यामागे राजकीय कटाचा भाग असल्याचा भाजपाचा आरोप आहे. असे दोन्ही पक्षामध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असताना शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त केलेल्या चुकीचे भांडवल भाजपाकडून सुरू करण्यात आले आहे.

“शिवसेना पूर्वीपासून डोंबिवलीत शिवजयंती उत्सव साजरी करते. परंतु शिवसेनेविषयी निष्ठा नसलेली, हिंदुत्वाचा अभिमान नसलेली अशी उसनी माणसे पक्षात आली की अशा चुका घडायला सुरुवात होते. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक कळत नाही ते जर शिवसेनेचे शहरप्रमुख असतील तर यासारखे दुर्दैव नाही,” अशी टीका भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बहूसदस्य प्रभाग पद्धतीत शिवसेनेने डोंबिवली पूर्व येथील सावरकर रोड प्रभाग रद्द करून हिंदुत्वाविषयी असलेला तिरस्कार जाहीर केला आहेच. शिवाजी महाराज यांचा फोटो फलकावर न लावून शिवसेनेचे हिंदुत्व कोणत्या दिशेने चाललेले आहे, हे सेनेने दाखवून दिले आहे , अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले, “जे कधीच शिवजयंती साजरी करत नाहीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती विषयी बोलू नये. डोंबिवली शहरात शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे १५ फलक लावले आहेत. प्रत्येक फलकावर महाराजांचा वेगळ्या प्रकारचा फोटो लावला आहे. फक्त एका फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लहान आणि संभाजी महाराजांचा फोटो मोठा झाला आहे, फार मोठी चुकी आमच्याकडून झालेली नाही. नजरचुकीने हा प्रकार घडला आहे. त्याचं कोणीही भांडवल करू नये”.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp targets shivsena over sambhaji maharaj photo on poster on shivjayanti in dombivli sgy

ताज्या बातम्या