मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्वबळाची घोषणा ; ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू,एकहाती सत्तेचा संकल्प

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये आतापर्यंत टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.

bjp flag
संग्रहित छायाचित्र

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांचे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते ‘आम्ही शिवसेनेचेच’ असा सूर आळवत असले तरी शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र भाजपने शनिवारी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत महापालिकेवर एकहाती सत्तेचा संकल्प सोडल्याने शिंदे समर्थक गोंधळले आहेत.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये आतापर्यंत टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राज्यातील ताज्या घडामोडींनंतर यापुढील चित्र कसे असेल याविषयी कमालीची उत्सुकता असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पुढील महिन्याभरात प्रत्येक प्रभागात विशेष जनसंपर्क मोहीम आखण्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी ज्या प्रभागांमध्ये इच्छुकांची चाचपणी करण्यात आली होती त्यांनाही कामाला लागण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्यात सत्ताबदल घडविल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे कशी असतील, याविषयी उत्सुकता आहे. बंडखोर आमदार महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावे ठणाणा करताना दिसत असले तरी ठाणे जिल्ह्यात मात्र गेल्या काही वर्षांत वेगळे चित्र राहिले आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या प्रमुख शहरांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सरळ टोकाचा सामना गेल्या दोन वर्षांत पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात शिवसेनेचे स्थानिक नेते आक्रमक होताना दिसतात. राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री पद थेट एकनाथ शिंदे यांना दिले गेल्याने हे चित्र बदलेल का याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असले तरी शनिवारी ठाण्यातील भाजप नेत्यांनी एकत्र येत महापालिकेवर एकहाती सत्तेचा नारा दिल्याने शिंदेसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रभाग कोणाचाही असो, कामाला लागा

ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली. त्यात कट्टर शिंदे समर्थकांना नेहमीच महत्त्वाची पदे मिळाली आहेत. शिंदे म्हणतील तीच पूर्वदिशा असा कारभार या महापालिकेत अनेक वर्षांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते मात्र दीड-दोन वर्षांपासून महापालिकेतील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आले आहेत. याशिवाय पक्षबांधणी, निवडणुकांच्या तयारीसाठीही पद्धतशीरपणे पावले उचलली जात आहेत.

राज्यात सत्ताबदल होताच पुढे काय, असा प्रश्न भाजपच्या गोटात विचारला जात होता. नव्या सरकारचा शपथविधी  होताच ठाण्यातील काही नेत्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर शनिवारी तातडीने जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेत ठाण्यात ‘शतप्रतिशत भाजप’ असा नारा देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, कार्यकर्त्यांनी आम्ही शिवसेनेतच असल्याची भूमिका घेतली आहे. ठाण्यात शिंदे यांच्या समर्थनार्थ लागलेल्या फलकांवरही शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर केला जात आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुका शिंदे समर्थक कोणत्या चिन्हावर लढवणार याविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात असताना भाजपने मात्र ‘लढाई सुरूच ठेवा’ असा संदेशच कार्यकर्त्यांना दिल्याचे वृत्त आहे.

ही नियमित स्वरूपाची संघटनात्मक बैठक होती. पक्षाने बूथ सक्षमीकरणासाठी काही कार्यक्रम आखला आहे. त्याचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शतप्रतिशत भाजप हे पक्षाचे कायम उद्दिष्ट राहिले आहे. त्यामुळे ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे या दृष्टीनेही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

निरंजन डावखरे, आमदार आणि शहराध्यक्ष, ठाणे भाजप

रणनीती अशी..

’राज्यात सत्तापालटाच्या घडामोडींपूर्वी भाजपने महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली होती. यापैकी काहींना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

’शनिवारच्या बैठकीतही काम सुरूच ठेवा, असा संदेश इच्छुक उमेदवारांना देण्यात आल्याचे समजते. पुढील आठवडय़ापासून प्रत्येक प्रभागात जनसंपर्क मोहीम हाती घेणार. 

’ठाण्यातील ६७ प्रभागांमध्ये शिंदे समर्थक नगरसेवक होते. तेथेही भाजपमार्फत जनसंपर्क मोहीम राबवली जाणार.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp to contest municipal election in thane alone zws

Next Story
कल्याणमध्ये शॉर्ट सर्किटच्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी