पालिका निवडणुकांसाठी भाजपचे ‘भूमिपुत्र कार्ड’ ; ओबीसी जागर मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांचे संकेत

भूमिपुत्रांमुळे रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ९० टक्के जागा भाजपला मिळणार असल्याचा दावाही नेत्यांनी केला आहे.

ओबीसी जागर मोर्चा समारोप कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जगन्नाथ पाटील, हंसराज अहीर, कपिल पाटील यांसह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असून या निवडणुकांमध्ये भाजप भूमिपुत्र कार्ड वापरणार आहे. तसे स्पष्ट संकेत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बुधवारी ठाणे शहरात झालेल्या ओबीसी जागर मोर्चा समारोप कार्यक्रमात दिले. भूमिपुत्रांमुळे रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ९० टक्के जागा भाजपला मिळणार असल्याचा दावाही नेत्यांनी केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. त्यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर या पालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांचा समावेश आहे. तीन प्रभाग पद्धतीने या निवडणुका होणार असून प्रभाग रचना तयार करण्याचे काम पालिका प्रशासनांकडून सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वर्चस्व असून त्यालाच आव्हान देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यात ओबीसी समाज मोठय़ा प्रमाणात राहतो. नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांकडून केली जात असून या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. या मागणीसाठी समाजाने आंदोलन करत शक्तिप्रदर्शन केले होते. तरीही त्यांची मागणी मान्य होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारवर नाराज असलेल्या या समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले असून तसे संकेत भाजपच्या नेत्यांनी ओबीसी जागर मोर्चा समारोप कार्यक्रमात दिले.

ठाणे जिल्ह्यात भूमिपुत्र हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या भूमिपुत्रांच्या हक्कावर सरकार गदा आणत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांसाठी पुढच्या काळात ताकदीने काम करायचे आहे, असे भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. मग, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित केला. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील ९० टक्के जागा भाजपला मिळतील, असा दावा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी केला.

        

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp to fight municipal elections on local issues zws

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या